उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कळंब येथील खरेदी केलेल्या प्लॉटच्या ऑनलाइन नकला देण्यासाठी शिपायाने लाच मागितली हाेती. लाच घेतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यास रंगेहाथ पकडले.

माहितीनुसार ३० वर्षीय व्यक्तीचा कळंब येथे प्लॉट आहे. सर्व्हे नंबर २२५ मधील तीन खरेदी क्रमांकाच्या ऑनलाइन नकलासाठी त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय, कळंब येथे अर्ज केला होता. कार्यालयातील शिपाई सविता उत्तम इर्लेकर यांनी यासाठी तक्रारदाराकडे १२०० रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ६०० रुपये घेण्याचे ठरले. त्यानुसार पंचासमक्ष स्वत: त्यांनी लाच स्वीकारली. यात पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक हुलगे यांनी सापळा लावला होता. पथकात अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उप-अधीक्षक प्रशांत संपते, इफ्तेखार शेख, सिद्धेश्वर तावसकर, विशाल डोके, जाकीर काझी यांच्यासह चालक दत्तात्रय करडे यांचा समावेश होता.

भ्रष्टाचार बोकाळला 

कळंब दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये लाच घेताना पकडण्याची गेल्या सहा महिन्यातील ही दुसरी घटना आहे. विशेष म्हणजे जिल्हयातील कांही दुय्यम निबंधक कार्यालयात प्रत्येक खरेदी खताच्या मागे  साडेतीन ते चार हजार रुपये लाचेच्या स्वरूपात घेतले जातात. परंतु कळंब दुय्यम निंबधक कार्यालयात लाचखरोंना दुसऱ्यांदा पकडण्याची घटना घडली आहे. 



 
Top