उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शेती शिवारातील भांडणतंटे चे मूळ उगम असलेल्या शेत रस्ता पॅटर्न यशस्वीपणे राबवून नवा पॅटर्न राज्यात निर्माण केल्याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी  दिली. 

      उस्मानाबाद येथे ॲड.व्यंकट गुंड यांच्या अद्ययावत कार्पोरेट विधी आणि संपर्क  कार्यालयाला २३ फेब्रुवारीला भेट दिल्यानंतर छोटेखानी कार्यक्रमात आमदार पवार बोलत होते.

भाजपाचे ज्येष्ठ नेते गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड.मिलिंद पाटील, रुपामाता परिवाराचे प्रमुख ॲड.व्यंकट गुंड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. रुपामाता परिवारा कडून अभिमन्यू पवार यांचा यथोचित सत्कार झाल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात पवार म्हणाले की,शेत रस्ता ही शेतकऱ्यांची मुख्य अडचण आहे.२५ ते ३२ टक्के तक्रारी या केवळ शेत रस्त्याच्या शासनदरबारी आणि न्यायालयात प्रलंबित आहेत. आपण प्राधान्याने मागेल त्याला शेत रस्ता उपलब्ध करून दिला आणि आमदार निधी खर्च केल्याचं त्यांनी सांगितलं.            आपल्या मतदारसंघांमध्ये आगामी दोन वर्षांमध्ये सर्व शेती शिवार शेत रस्त्याला जोडून तंटामुक्त शेत-शिवार उपक्रम राबवून आदर्श निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितलं. 

 आतापर्यंत ६४० किलोमीटर क्षेत्रात ते तयार केलेले आहेत तर येत्या २ वर्षात ८०० किलोमीटर रस्ते करण्याचे नियोजन आहे.अट एकच आहे की,शेत रस्ता कमीत कमी एक किलोमीटरचा असावा आणि वीस फूट रुंदीचा असावा यासाठी आपण आमदार फंडातून निधी दिल्याचं पवार म्हणाले.  रुपामाता परिवाराची प्रगतीही कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

  भाजपाचे नेते ॲड.मिलिंद पाटील यावेळी म्हणाले की,संघ कार्यासाठी पूर्णवेळ वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांना निश्चित योग्य वेळी योग्य संधी दिली जाते हे अभिमन्यू पवार यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं.आपण काही काळ लातूर जिल्ह्याचे भाजपा प्रभारी म्हणून काम केल्याचे आठवण यावेळी व्यक्त केली.

     कार्यक्रमाच्या शेवटी बोलताना रुपामाता परिवाराचे प्रमुख ॲड. व्यंकट गुंड म्हणाले, रुपामाता परिवार सहकारामध्ये बऱ्यापैकी स्थिरावला आहे.गुळ पावडर निर्मिती चा प्रकल्प सुरू आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सुरू आहे. माझ्या सारख्या अन्य सहकार क्षेत्रातील व्यावसायिकांच्या काही अडचणी आहेत. यासंदर्भात आम्ही वेळोवेळी चर्चा विनिमय करून दिशाही ठरवत आहोत.  इथेनॉल संदर्भात राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भेटायचे आहे.याकामी आमदार अभिमन्यू पवार यांनी वेळ द्यावा अशी विनंती गुंड यांनी यावेळी केली.

       रुपामाता परिवाराच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमाला जि.प.सदस्य ज्ञानदेव राजगुरू, अॅड.अजित गुंड, दत्ता सोनटक्के मजूर फेडरेशनचे चेअरमन नन्नवरे, पत्रकार राजाभाऊ वैद्य  तसेच परिवारातील कर्मचारी, अधिकारी  उपस्थित होते.


 
Top