उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी होणाऱ्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी झाली असून बिनविरोध निवडणुकीचा डाव फसल्याने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या 15 जागापैकी 5 जागा या बिनविरोध झाल्याने 10 जागासाठी 20 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाला प्रत्येकी 5 जागा या फॉर्मुलावर ही निवडणुक लढवली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 90 पैकी 63 जणांनी अर्ज मागे घेतल्याने 10 जागासाठी 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

तुळजापूर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातून सुनील मधुकरराव चव्हाण, उमरगा सोसायटी संघातून बापूराव पाटील, भूम मतदार संघातून मधुकर मोटे, परंडा मतदार संघातून ज्ञानेश्वर पाटील व वाशी मतदार संघातून विक्रम सावंत हे 5 उमेदवार बिनविरोध आले असून संचालकपदी निवडून आले आहेत. 5 पैकी निवडून आलेल्या जागेत शिवसेना 2, काँग्रेस 2 तर राष्ट्रवादी 1 अशी संख्याबळ आहे. उर्वरित 10 जागापैकी 3 जागेवर शिवसेना, 3 जागेवर काँग्रेस तर 4 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस लढत आहे त्याविरोधात भाजप सर्व 10 जागेवर लढत आहे.

उस्मानाबाद विकास सोसायटी मतदार संघात शिवसेनेचे नानासाहेब पाटील विरुद्ध चंद्रकांत कदम पाटील अशी थेट लढत होणार आहे तर कळंब मतदार संघात भाजपचे श्रावण सावंत, सिंधुबाई बोंदर व शिवसेनेचे बळवंत तांबारे अशी तिरंगी लढत होत आहे. लोहारा मतदार संघातून काँग्रेसचे नागप्पा पाटील व भाजपचे राहुल पाटील यांच्यात लढत होणार आहे. इतर शेती संस्था गटातून भाजपचे सतीश दंडनाईक व शिवसेनेचे संजय देशमुख या दोघात, नागरी बँक पतसंस्था गटातून राष्ट्रवादीचे सुरेश बिराजदार, भाजपचे सुधीर पाटील व राजकुमार माने अशी तिरंगी तर अनुसूचित जाती मतदार संघात भाजपचे कैलास शिंदे व राष्ट्रवादीचे संजय कांबळे यात लढत होणार आहे तर महिला गटात 2 जागासाठी राष्ट्रवादीच्या प्रविणा कोलते, काँग्रेसच्या अपेक्षा प्रकाश आष्टे व भाजपकडून उषा उत्तमराव टेकाळे आणी सुवर्णा राजाराम कोळगे या चौघीत लढत होणार आहे. इतर मागास प्रवर्ग गटातून भाजपचे विजय शिंगाडे व काँग्रेसचे मेहबूब पाशा पटेल यांच्यात लढत होणार आहे. विशेष मागास प्रवर्ग गटातून राष्ट्रवादीचे संजीव पाटील व भाजपचे वैभव मुंडे यांच्यात लढत होणार आहे. 

निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्या दालनात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडली.11 फेब्रुवारी रोजी चिन्ह वाटप व उमेदवार यांची अंतिम यादी प्रसिद्ध करता येणार आहे तर 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 4 या वेळेत विविध मतदान केंद्रावर मतदान करता येणार आहे तर 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. मतदान केंद्राची यादी नंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 5 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले तर इतर 10 जागावर अनेक ठिकाणी इच्छा नसतानाही पक्षश्रेष्टी, नेत्याच्या दबावामुळे व नेत्यांच्या वारसांचे आणी नातेवाईक यांचे लाड पुरवावे लागत असल्याने उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत घराणेशाहीचा बोलबाला नेहमीप्रमाणे दिसला, महाविकास आघाडी व्यतिरिक्त अंतर्गत वाटघाटी,व्यक्तिक हितसंबंध यावर नेत्यांनी भर देत सामान्य कार्यकर्ते यांचा बळी घेतला.वयक्तिक विरोध कोण घ्यायचा ? पक्षा व्यतिरिक्त एकमेकांचे मधुर प्रेम संबंध जोपासले गेले. ओम राजे व राणा पाटील यांचे राजकीय वैर सोडून सर्वपक्षीय नेत्यांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घातल्याचे दिसले तर भाजपने तुळजापूर मतदार संघातील जागा काँग्रेसचे सुनील मधुकरराव चव्हाण यांच्यासाठी सोडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या, विशेष म्हणजे तुळजापूर येथे भाजपचे राणाजगजीतसिंह पाटील आमदार आहेत. वाशी येथे राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार राहुल मोटे यांच्या आदेशाने शिवसेनेचे नेते आमदार डॉ तानाजीराव सावंत यांचे पुतणे केशव सावंत यांच्यासाठी माघार घेतली. सर्व प्रमुख नेत्यांच्या जागा सुरक्षित ठेवण्यावर भर दिला गेला. युवा नेत्यांनी व कार्यकर्ते यांनी कायम सतरंजी उचलायची व जयघोष करायचा हा संदेश या निवडणुकीतही देण्यात आला.


 
Top