मुरूम,  / प्रतिनिधी : मनुष्याच्या अंगी भक्ती आणि श्रद्धा असून या परिवारात कै. माधवराव पाटील यांच्या विचारांचा वसा आणि वारसा चालवत त्यांचे स्वप्न साकार करण्याकरिता त्यांचे संस्कार घेऊन बसवराज पाटील व बापूराव पाटील हे बंधू या परिसरातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करीत आहेत. खरेतर मनुष्याच्या जीवनामध्ये त्याचा सर्वांगीण विकास साधावयाचा असेल तर त्यांच्यामध्ये सर्वगुणसंपन्नता आली पाहिजे असे प्रतिपादन उजैनी पीठाचे श्री श्री श्री १००८ जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामी यांनी केले.                             
  श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्यात गुरुवारी (ता.१७) रोजी उजैनी पीठाचे श्री श्री श्री १००८ जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या शुभहस्ते चालू हंगामातील उत्पादित ६ लाख ६१ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन करण्यात आले. विठ्ठलसाईला काशी पीठाचे जगद्गुरू श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी सदिच्छा भेट देवून शुभ आशीर्वाद दिला.  यावेळी कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे माजीअध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, शरणय्या स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव, कारखान्याचे संचालक केशव पवार, विठ्ठलराव पाटील, माणिकराव राठोड, संगमेश्वर घाळे, शिवमुर्ती भांडेकर गुरुजी, अँड. व्ही. एस. आळंगे, चंद्रकांत साखरे,  कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. अथणी, नगराध्यक्षा अनिता अंबर, लोहारा पंचायत समिती सभापती रणखांब, माजी नगराध्यक्ष रशिद शेख, मुळे आदींची उपस्थिती होती. यावेळी स्वामीजींनी आशीर्वचनपर बोलताना पुढे म्हणाले, ज्यामध्ये साहस, धैर्य, कष्ट करण्याची उर्मी, चांगली भावना, शक्ती व चांगला दृष्टिकोन अशा वेगवेगळ्या गुण असणाऱ्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने परमेश्‍वर देखील साथ देत असतो. परिसरातील जनतेचे चांगले हितसंबंध राखण्याकरिता कारखाना प्रयत्नशील आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड जीवनात घालून सर्वांनी जगले पाहिजेत असे ते शेवटी म्हणाले. कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील म्हणाले की, या कारखाना परिक्षेत्रातील एकाही शेतकऱ्याचा ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू पाटील तर आभार विठ्ठलराव बदोले यांनी मानले. या परिसरातील शेतकरी, सभासद, कारखान्यातील कर्मचारी वृंद बहुसंख्येने उपस्थित होते.              

 
Top