उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही आई- वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी अथक परिश्रम करून नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवूनही केवळ आर्थिक विवंचनेमुळे वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या व प्रवेशानंतर पैशाची चिंता असलेल्या जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या वतीने सोमवारी (ता. ७) आर्थिक मदत करण्यात आली.

८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीनुसार जिल्ह्यात शिवसेना काम करते. त्याचाच एक भाग म्हणून वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र असूनही केवळ बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेणे शक्य नसलेल्या जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, आमदार कैलास घाडगे पाटील, तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सागर बाराते, अजय समुद्रे, सचिन काळे,पंकज माने यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मदत करण्यात आली.

शिराढोण (ता. कळंब) येथील संजयकुमार नंदकुमार प्रजापती याने नीट परीक्षेत 720 पैकी 655 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. त्याचे वडील भेळची विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. मात्र कोरोनाच्या परिस्थितीत गेल्या दोन वर्षांत त्यांचा हा व्यवसायही ठप्प झाला. त्यानंतर त्याच्या आई- वडिलांनी मजुरी करून कुटुंबाची उपजिविका भागवली. अशा बिकट आर्थिक परिस्थितीतही संजयकुमार याने जिद्दीने, अपार कष्ट करून नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शासकीय कोट्यातून तो वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरला आहे. त्याने मुंबई येथील ग्रॅंड मेडिकल कॉलेज जेजे हॉस्पिटल येथे शासकीय वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळविला. मात्र बिकट आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षणासाठीच्या खर्चाची त्याला व त्याच्या कुटुंबियाला चिंता आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेने संजयकुमार प्रजापती याला शिक्षणासाठी आर्थिक मदत केली आहे.

बोरगाव (ता. कळंब) येथील आकांक्षा राजाभाऊ समुद्रे या शेतकऱ्याच्या मुलीने नीट परीक्षेत 550 गुण घेऊन यश मिळविले आहे. लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात तिने पहिल्या वर्षात प्रवेशही मिळविला आहे. परंतु बिकट आर्थिक परिस्थितीमुळे तिच्या शिक्षणाचा खर्च पेलवण्याची चिंता समुद्रे कुटुंबियांना लागली आहे. आकांक्षाच्या वडिलांना केवळ एक एकर कोरडवाहून शेती आहे. शेतीतील उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नसल्याने ते खवाभट्टी चालवतात. अशा बिकट परिस्थितीमध्ये आकांक्षाने शिक्षण घेत नीट परीक्षेत यश मिळवून वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळविला. परंतु पुढील शिक्षणासाठीच्या खर्चाची तिला व तिच्या कुटुंबियांना चिंता लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेच्या वतीने आकांक्षाला वैद्यकीय शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली.

खानापूर (ता. उस्मानाबाद) येथील समर्थ राजेंद्र पाटील याने देशपातळीवर घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत 625 गुण मिळविले आहेत. पुणे येथील बीजेएमसी मेडिकल कॉलेजमध्ये त्याचा प्रवेशही निश्चित झाला आहे. समर्थचे वडील एका दुकानात काम करून कुटुंबाची उपजिविका भागवतात. वैद्यकीय शिक्षणासाठी समर्थ पात्र ठरल्याचा आनंद या कुटुंबियाला असला तरी दरवर्षी शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाची चिंता त्यांना आहे. ही रक्कम कोठून जमा करावी, असा प्रश्न समर्थच्या आई- वडिलांसमोर आहे. त्यालाही आर्थिक मदत करण्यात आली. 

वडिलाचे छत्र हरवलेले असतानाही व आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही त्याचा बाऊ न करता जिद्द आणि कष्टाच्या बळावर नितळी (ता. उस्मानाबाद) येथील अंकिता बालाजी कुंभार या भागातील या मुलीने नीट परीक्षेत यश मिळविले आहे. तिचा लातूर येथील महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणासाठीचा प्रवेशही निश्चित झाला आहे. तिच्या कुटुंबाची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, तिलाही वैद्यकीय शिक्षणासाठी शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. 

या चारही विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबियांनी या आर्थिक मदतीबद्दल शिवसेनेचे आभार मानले.

 

 
Top