उस्मानाबाद (प्रतिनिधी) 

तेरणा मध्यम प्रकल्प कालवा दुरुस्ती कामासाठी 3 कोटी 42 लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांना यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे.

24 जून 2021 रोजी उस्मानाबाद येथील शिंगोली शासकीय विश्राम ग्रहामध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली होती. 

      या बैठकीमध्ये उस्मानाबाद जिल्ह्याच्या सिंचन दृष्टिकोनातून अस्तित्वात असलेल्या कालव्याची देखभाल-दुरुस्ती करण्यात यावी आणि या कालव्याद्वारे शेतीसाठी सिंचन उपलब्ध व्हावे असे आदेश दिले होते. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी देखील या संदर्भात वेळोवेळी मागणी केल्यानंतर जलसंपदा मंत्र्यांनी या कामासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.

     औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयाने लाभक्षेत्र विकास जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक यांना 31 डिसेंबर 2021 रोजी दिलेल्या पत्रामध्ये तेरणा मध्यम प्रकल्प कालवा नियमित देखभाल दुरुस्ती करिता 3 कोटी 42 लाख 52 हजार 500 रुपये खर्चाचे अंदाजपत्रक प्राप्त झाल्याचे सांगितले आहे. यामध्ये मातीकाम,भराव काम,झाडे-झुडपे छाटणीची कामे यांत्रिकी विभागाकडून करण्याचे नमूद करण्यात आलेले आहे.

 लातूर येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक यांनी हा प्रस्ताव मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक औरंगाबाद यांच्याकडे पाठवलेला आहे. 

    24 जानेवारी 2022 ला उस्मानाबाद पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना माहितीस्तव पत्र देण्यात आलेले आहे. तेरणा मध्यम प्रकल्प कालव्याची दुरुस्ती व्हावी याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी सह तेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पृथ्वीराज आंधळे यांच्यासह प्रशांत फंड, महादेव खटावकर,आकाश नाईकवाडी,बबलू कोळपे, मसूद काजी,नजीम 

मासुलदार,अमोल कसबे भैय्या माळी,विशाल फंड, अविनाश इंगळे,नामदेव कांबळे व असंख्य शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन तेरणा मध्यम प्रकल्प कालवा दुरुस्तीची मागणी केली होती. त्या मागणीला यश आले आहे. 

     लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवानेते पृथ्वीराज आंधळे यांनी मी सांगितले आहे.

 
Top