उस्मानाबाद / प्रतिनिधी-          

जिल्ह्यात मोठ्या उद्योगांचा अभाव, कमी पर्जन्यमान, वाढत्या लोकसंख्येमुळे प्रती कुटुंब कमी होत चाललेली जमीन धारणा, त्यातच सातत्याने येत असलेल्या नैसर्गिक आपत्ती या बाबी लक्षात घेता येथील अर्थकारणाला गती देण्यासाठी युवकांना रोजगार स्वयं - रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. जिल्हयाला मोठा ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक व पर्यटन स्थळांचा गौरवशाली वारसा लाभलेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी व आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी उद्योग व पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातूनच या भागाच्या विकासाला व अर्थकारणाला मोठी चालना मिळू शकते. त्यामुळे तुळजापूर तीर्थक्षेत्राचा ‘प्रशाद’ योजनेमध्ये समावेश करण्यासह कौडगाव येथे तांत्रिक कापड निर्मिती प्रकल्प व नळदुर्ग तालुका तुळजापूर शहरालगत नवीन एमआयडीसी सुरू करण्याबाबतचे राज्य सरकार कडील दोन वर्षांपासुन प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी बैठक बोलावण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्रासह भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने भेटी दरम्यान राज्याच्या उद्योग व पर्यटन राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्याकडे तुळजापूर येथे केली आहे.

  तूर्तास कोवीड १९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष बैठक बोलावणे शक्य होत नसल्यास किमान व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे तरी मंत्री महोदय बैठक बोलावतील अशी अपेक्षा आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्षा सौ. अर्चनाताई अंबुरे, युवती जिल्हाध्यक्ष पुजा राठोड, ॲड. ज्योती वाघे, वर्षा पाटील इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

 
Top