उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कळंब तालुक्यातील वडगाव येथील गौरी कला केंद्रात येरमाळा पोलिसांनी गुरुवारी रात्री दीड वाजता छापा टाकला. त्यात २७ नृत्यांगणांसह ३६ पुरुष एकत्र जमले असल्याचे निदर्शनास आले. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री नऊ ते सकाळी सहा पर्यंत पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई केली. त्याचा आधार घेत गुन्हा नोंदवला.

कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाने मनाई आदेश काढले आहेत. त्याची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहेत. त्यानुसार गुरुवारी कळंब येथील उपविभागीय कार्यालयातील पोलिसांचे पथक वडगाव शिवारात रात्र गस्तीवर होते. त्यावेळी गौरी कला केंद्रास भेट दिली. यावेळी कलाकेंद्र मालक मन्सूर शेख रा. लातूर यांनी केंद्रात २७ नृत्यांगणासह ३६ पुरुष एकत्र जमवले होते. तेथे नृत्यांगना अश्लील व बिभत्स हावभाव करत नृत्य करत असल्याचेही दिसून आले. जामखेड येथील सुरज निकाळजे हा तेथे मद्यपुरवठा करत असताना आढळून आला. यावरून येरमाळा ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

 
Top