मुरूम/ प्रतिनिधी

 केसरजवळगा,(ता. उमरगा) येथील आनंदराय भुरे यांचे सुपुत्र मेजर महेशकुमार भुरे यांचा  दि.२२ नोव्हेंबर २०२१ रोजी देशाचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शौर्य चक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. याच  अनुषंगाने रविवारी (दि.९ ) रोजी ग्रामस्थांच्या वतीने भुरे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. 

 जडी बसवलिंगेश्वर मठात पार पडलेल्या या सत्कार सोहळ्यात प्रारंभी उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, मठादिपती विरंतेश्वर, मेजर भुरे यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व द्वीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. या ग्रामीण भागातील सुपुत्र सातारा येथील सैनिकी शाळेत शिक्षण घेऊन त्यानंतर पुणे येथे अभियंता पदवी घेऊन सन २०१४ मध्ये आर्मी मध्ये भरती झाले. अवघ्या वयाच्या ३१ वर्षी त्यांनी परिश्रम, मेहनत करुन आर्मीतील तिसऱ्या रँकवर झेप घेतली. काश्मीर येथे कट रचणाऱ्या आंतकवादीचे कट उधळून लावण्यासाठी मेजर महेशकुमार भुरे यांच्या नेतृत्वाखाली योजना आखली व ती सफल ही केली. त्याच बरोबर आपल्या सहकारी सैनिकांचे प्राण त्यांनी वाचवले त्यांच्या या शौर्याबद्दल भारत देशाचे  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना शौर्यचक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. खासदार ओमराजे निंबाळकर,  मठादिपती विरंतेश्वर, प्रशासकीय प्रतिनिधी, परिसरातील सरपंच, प्रतिष्टीत नागरिक, सर्व राजकीय पक्ष व ग्रामस्थांच्या वतीने मेजर भुरे यांचा नागरी सत्कार करून गौरविण्यात आले. 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना निंबाळकर म्हणाले की, प्रामाणिकपणे मेहनत आणि प्रयत्न करत रहाल तर यश आपोआप मिळते. ग्रामीण भागातील युवकांना आदर्शवादी असे कार्य मेजर भुरे यांचे असून उस्मानाबाद जिल्ह्याचा नाव त्यांनी संपूर्ण देशात गाजवले. त्यांना समस्त जिल्हावासीयांकडून सलाम करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. मेजर भुरे यांनी मनोगत व्यक्त करताना सैनिकाबद्दल युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव, संताजी चालुक्य, भाजपचे नेते राजू मिणियार आदींनी मनोगत व्यक्त करून भुरे यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी यांनी मेजर भुरे यांना पत्र पाठवून त्यांच्या कार्यबद्दल व पुरस्काराबद्दल  शुभेच्छा दिल्या. ग्रामस्थ, विविध सामाजिक संघटनेकडून भुरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे बसवराज वरनाळे, गोविंद पाटील, नगरसेवक अजित चौधरी, गुलाब डोंगरे, राजेंद्र कारभारी, उपसरपंच गुरबस भुरे, संगमेश्वर घाळे, दत्तात्र्य जिरोळे, मल्लय्या स्वामी, आनंदराव भुरे, श्रीमंत भुरे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. सायबण्णा घोडके तर आभार सरपंच बलभीम पटवारी यांनी मानले.

 
Top