उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 छोटे-मोठे उद्योग उभे करण्यासाठी अनेक अटी शासनाने घालून दिलेल्या आहेत. या अटींमध्ये उद्योग उभा करण्यासाठी आवश्यक असलेले कर्ज केवळ राष्ट्रीयीकृत बँकेकडूनच घेणे बंधनकारक केले असल्यामुळे उद्योग उभा करण्यासाठी मोठ्या अडचण निर्माण होत आहेत. या अडचणी सोडवून नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. 

इतर देशात सरकार उद्योगांना प्रोत्साहन देत असल्यामुळे त्या देशाची प्रगती झाली आहे. त्यामुळे देशात जोपर्यंत उद्योगाचे जाळे निर्माण होणार नाही. तोपर्यंत देश पुढे जाणार नाही असे प्रतिपादन रुपामाता उद्योग समूहाचे अध्यक्ष ऍड. व्यंकटराव गुंड यांनी केले.

रुपामाता उद्योग समूहाच्यावतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांच्या सत्काराचे आयोजन रुपामाता मल्टीस्टेटच्या सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सहसचिव तथा रुपामाताचे संचालक राजाभाऊ वैद्य, रुपामाता मल्टीस्टेट चे मुख्याधिकारी मिलिंद खांडेकर, रुपामाता अर्बन बँकेचे मुख्याधिकारी सत्यनारायण बोधले आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना ऍड. गुंड म्हणाले की, उद्योग उभा करताना उद्योजकांच्या काय अडचणी आहेत ? त्या अडचणी पत्रकारांनी जाणून घेऊन आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यावर प्रकाश टाकून त्या अडचणी सरकार व  प्रशासनाच्यासमोर आणणे अत्यंत गरजेचे आहे. कारण एक उद्योग उभा राहिला तर अनेक हाताला काम या माध्यमातून सहजरित्या उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे देशातील नागरिकांना खऱ्या अर्थाने समृद्ध व स्वावलंबी करायचे असेल तर उद्योगाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. आज देशात कच्चामाल मोठ्या प्रमाणात आयात केला जातो. त्याऐवजी छोटे-मोठे उद्योग वाढले तर हा कच्चामाल बाहेरून आयात करण्याची गरज पडणार नाही. तसेच नवउद्योजक तयार झाल्यास अनेकांच्या हाताला काम मिळू शकते असे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे काही पत्रकार ब्रेकिंग न्यूजच्या नादात बातमीची कोणत्याही प्रकारची सत्यता न पाहता व खात्री न करता ठळकपणे व भडकाऊपणे बातमी प्रसिद्ध करुन एखाद्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत असून हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. त्यामुळे पत्रकारांनी प्रत्येक बातमीची सत्यता पडताळूनच ती बातमी देणे आवश्यक ठरणार आहे. विशेष म्हणजे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचाराला काळीमा फासण्याचे काम पत्रकारांच्या हातून होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तर राजाभाऊ वैद्य, विनोद बाकले, प्रभाकर लोंढे, मल्लिकार्जुन सोनवणे यांनी आपले विचार व्यक्त केले. 

यावेळी राजाभाऊ वैद्य, विनोद बाकले, मच्छिंद्र कदम, मल्लिकार्जुन सोनवणे, सुधीर पवार व प्रभाकर लोंढे या पत्रकारांचा शाल, डायरी, पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवून पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सागर खोत यांनी तर उपस्थितांचे आभार सत्यनारायण बोधले यांनी मानले.

 
Top