उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजी सुरू ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे यासाठी आगामी 3 आठवड्यात प्रशिक्षण रूपरेषा तयार करावी व पुढील महिन्यात प्रत्यक्ष प्रशिक्षण द्यावे , या प्रशिक्षणासाठी जे शिक्षक नकार देतील किंवा टाळाटाळ करतील त्याच्यावर कारवाई करावी. तसेच जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या वतीने माध्यमिक शाळेत 9 वी व 10 हे वर्ग सेमी इंग्रजीमधून सुरू करण्यासाठी मार्गदर्शन मागविण्याचा ठराव घेण्यात आला. यावेळी विशेष सर्वसाधारण सभेत कांही अधिकारी वर्ग व कांही शिक्षक संघठना जि.प.च्या सभागृहाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतात याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. 

नवीन शिक्षक भरती प्रक्रिया करताना विज्ञान पदवीधारक शिक्षक याना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. वरिष्ठ शिक्षणाधिकारी यांची उस्मानाबाद जिल्ह्यात प्रतिनियुक्ती करावी असे ठराव घेण्यात आले अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी दिली.उपाध्यक्ष धनंजय सावंत, अर्चना पाटील, धीरज पाटील, शरण पाटील, नेताजी पाटील, ज्ञानेश्वर गिते, प्रकाश अष्टे, सक्षणा सलगर, सुरेश बिराजदार, दत्ता साळुंके, संदीप मडके यासह पदाधिकरी उपस्थित होते.जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने घेतलेला निर्णय शिक्षण आयुक्तांना कळवू तसेच याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठवू व त्यांनी दिलेल्या निर्णयाप्रमाणे अमलबजावणी करू अशी माहिती मुख्य कार्यकारी अधीकारी राहुल गुप्ता यांनी दिली. द्विभाषिक पद्धतीने शिक्षण सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

 डायटने जिल्हा परिषदेच्या परस्पर , सदस्य याना विश्वासात न घेता जिल्हाधिकारी यांना अहवाल दिला हे चुकीचे आहे. शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी ही डायटची होती मात्र त्यांनी टाळाटाळ केली. आधीच कोरोनाने विद्यार्थी यांचे नुकसान झाले आहे असे मत उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी व्यक्त केले. डायट व काही शिक्षक संघटना यांनी मिळून केलेला हा कार्यक्रम असल्याची टीका केली. 

 स्वतःची मुले इंग्रजी माध्यमात शिकवितात मात्र गोरगरीब शेतकऱ्यांची मुले मराठीत का? असा सवाल दत्ता साळुंके यांनी उपस्तिथीत केला. खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत. खासगी शाळेत 7 हजारावर शिक्षक काम करीत आहेत मात्र जिल्हा परिषदेत 80 हजार पगार घेऊनही काम करीत नाही हे चुकीचे आहे असे ते म्हणाले.सेमी बंदचा प्रस्ताव परस्पर पाठविणारयावर काय कारवाई करणार असा प्रश्न संदीप मडके यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद सभेचा हा अपमान आहे त्यामुळं प्रस्ताव पाठविणारया या अधिकारी वर कारवाई करा अशी मागणी मडके यांनी केली

ग्रामीण भागात अनेक उच्च शिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्यांना तासिका बेसवर इंग्लिश शिकविण्याचे काम द्या अशी मागणी महेंद्र धुरगुडे यांनी केली.  पट कमी झाला असेल तर अतिरिक्त शिक्षकांचे करायचे काय त्यांना रत्नागिरीला पाठवा अशी मागणी त्यांनी केली. जिल्हा परिषद बंद करा व  जिल्हाधिकारी कार्यालयात कारभार हलवा असा टोला  धुरगुडे यांनी लगावला.

ग्रामीण भागात विद्यार्थी याना इंग्रजी ज्ञान मिळाले पाहिजे, इंग्रजी येत नसल्यास 11 वीला त्रास होतो त्यामुळे शिक्षकांना प्रशिक्षण देऊन सेमी सुरू ठेवा असे सुरेश बिराजदार यांनी सांगितले. 

 
Top