उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासासाठी पंतप्रधान मा.ना.नरेंद्रजी मोदी साहेब अतिशय सकारात्मक असून शनिवारी विविध राज्यातील मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधताना त्यांनी बहुतांश वेळ आकांक्षीत जिल्ह्यांच्या विषयावरच आपले विचार मांडले. देशातील अनेक आकांक्षीत जिल्ह्यामध्ये आरोग्य,   शिक्षण,   दळणवळण,   वीज, रस्ते, पाणी, रोजगार स्वयं रोजगार या क्षेत्रां मध्ये उत्कृष्ट काम झाल्याचे सांगत शासन व प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले. हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असुन देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात या जिल्ह्यांची देश व अंतराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख निर्माण व्हावी असे महत्वकांक्षी उद्दिष्ट देखील त्यांनी ठेवले.आकांक्षीत जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या प्रकारे इतर राज्यातील जिल्ह्यांमध्ये काम झाले आहे, त्या प्रकारे दुर्दैवाने कृषि क्षेत्रा व्यतिरिक्त इतर क्षेत्रांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र समाधानकारक काम झालेले नाही. वारंवार पाठपुरावा करून देखील, राज्य सरकार जिल्ह्याच्या एकात्मिक विकासाकडे गांभीर्याने पाहत नाही, असा आरोप ही आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केला आहे. 

पंतप्रधान   नरेंद्र  मोदी यांच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जिल्ह्यातील विकास कामांना चालना देण्याच्या उद्देशाने केंद्रीय वित्त मंत्री ना.डॉ. भागवत कराड साहेब यांना बैठक घेण्याची विनंती केली होती. या अनुषंगाने दिनांक २८ जानेवारी २०२२ रोजी ऑनलाईन बैठक ठेवण्यात आली आहे. सदरील बैठकीस नीती आयोगाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे सर व्यवस्थापक, जिल्हास्तरीय यंत्रणेचे सर्व विभागप्रमुख, अग्रणी बँक व्यवस्थापक, सर्व बँकांचे विभागीय व्यवस्थापक व जिल्हा प्रतिनिधी ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत.

 जिल्ह्याच्या बलस्थानांचा वापर करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल याचा प्राथमिक आराखडा बनविणे अभिप्रेत आहे. पंतप्रधान मोदींजींच्या संकल्पनेतील जिल्ह्याच्या विकासाची वाटचाल गतिमान करण्यासाठी या बैठकीचा निश्चितच मोठा फायदा होणार आहे. आकांक्षित जिल्ह्याच्या विकासाबाबत केंद्र सरकार अग्रणी आहे, मात्र राज्य सरकारची अन उत्सुकता प्रकर्षाने जाणवते.

वित्त राज्यमंत्री ना.डॉ.कराड यांच्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा करून पुढील कृती आराखडा ठरविण्यात येईल. नीती आयोगाचे अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान   नरेंद्रजी मोदी  याबाबत अतिशय सकारात्मक असून जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितच आवश्यक निधी देतील याचा मला विश्वास आहे.


 
Top