उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील रुईभर येथील खंडोबा डीपी (रोहित्र) दोन महिन्यांपूर्वी जळाला. परंतु महावितरणने हा डीपी अजूनही दुरुस्त केला नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पैसे दिल्याशिवाय डीपी चालू होणार नाही, अशी भूमिका महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे हा डीपी तत्काळ दुरुस्त करुन पाण्याअभावी होणारे रब्बी पिकांचे नुकसान टाळावे, अशी मागणी भाजप किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली.

यासंबंधी सोमवारी (दि.२४) महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, रुईभर येथील डीपी दोन महिन्यांपूर्वी जळाला. बेंबळी येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला. परंतु दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी करण्यात येत आहे. या डीपी वरील सर्व जोडणी धारकांनी बिल भरल्यानंतर डीपी दुरुस्त करण्याची जबाबदारी महावितरणची आहे.

परंतु शेतकऱ्यांच्या शिखातील पैशातून डीपी दुरुस्त करणे हा महावितरणचा रझाकारी कारभार आहे. डीपी बंद असल्याने पाण्याअभावी रब्बी पिकांचे नुकसान होत आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर भाजप किसान मोर्चाचे पूर्व मराठवाडा संपर्कप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे, वामन भणगे, गुरुनाथ भणगे, राहुल घोडके, अनिकेत कोळगे आदींच्या स्वाक्षरी आहेत.


 
Top