उस्मानाबाद / प्रतिनिधी-

माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त येथील लोकसेवा समितीच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या लोकसेवा पुरस्कारांची घाेषणा झाली आहे. शहरातील श्री साई सामाजिक व सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक रोहित निंबाळकर यांना रक्तदान सेवेबद्दल, बालग्राम परिवाराचे गेवराई संतोष व प्रिती गर्जे तसेच अंत्यविधी सेवेत कार्यरत बाळासाहेब गोरे यांना लोकसेवा पुरस्कार शनिवारी (दि.२५) प्रदान केले जाणार आहेत.

लोकसेवा पुरस्कारांचे हे १२ वे वर्ष असून समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने सातत्यपूर्ण निरपेक्षपणे आणि प्रसिद्धीपासून कायम दूर राहून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सेवाव्रतींच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी लोकसेवा समितीच्या वतीने हे पुरस्कार प्रदान केले जात आहेत. शनिवारी सकाळी ११ वाजता आर्य चाणक्य विद्यालय (उस्मानाबाद) येथे होत असलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद पाटील असणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन लोकसेवा पुरस्कार संयोजन समितीचे सदस्य डॉ.अभय शहापूरकर, कमलाकर पाटील,शेषाद्री डांगे यांनी केले आहे.


 
Top