प्रश्‍नांच्या सोडविणूकीसाठी बसविणार शाळेत तक्रार पेटी 


 उस्मानाबाद /प्रतिनिधी -

उस्मानाबाद जिल्ह्यातल बालविवाहाचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बालविवाह मुक्त गाव ही संकल्पना राबविण्यात येणार असून शाळकरी मुलींच्या बालविवाह, आरोग्य, शिक्षण यासारख्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेत तक्रार पेटी बसवून मुलींच्या मनात भेडसावणार्‍या समस्यांना सोडवण्यासाठी पालक-शिक्षक-संस्थाचालक आणि प्रशासन यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जि.प अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी केले. त्या बुधवारी दि.१ डिसेंबर आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने उस्मानाबाद शहरातील शम्स उर्दू हायस्कूल येथे आयोजित किशोरवयीन मुलींसाठी संवाद कार्यशाळेत बोलत होत्या.

यावेळी गटशिक्षण अधिकारी रोहिणी कुंभार, जिल्हा लसीकरण अधिकारी कुलदीप मिटकरी, उपशिक्षण अधिकारी (मा) रत्नमाला गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी अरुणा कांबळे, दैवशाला हाके, संजय बागल, युनिसेफच्या प्रतिनिधी सोनिया हंगे, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे प्रतिनिधी गणेश चादरे आदींची उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना सौ.कांबळे पुढे म्हणाल्या की, उस्मानाबाद जिल्ह्याने माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी, घरकुल योजना, कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण यात चांगली कामगिरी केल्याचे नमूद करून त्या पुढे म्हणाल्या की बालविवाहाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीने विवाहनोंदणी पूर्वी मुला मुलींच्या जन्माचं प्रमाणपत्र ज्यामुळे वयाची माहिती होते त्याची विवाहापूर्वी माहिती ठेवल्यास बालविवाह गावातच रोखता येऊ शकतील. ग्रामीण भागातल्या शाळकरी मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येणार असून गावपातळीवर आशा अंगणवाडी कार्यकर्ती यांनी बालविवाह रोखण्यासाठी डोळसपणे कार्य करण्याची गरज आहे. अंधश्रद्धा गैरसमजुती तसंच मुला मुलींचे गळतीचे वाढलेल प्रमाण यामुळे बालविवाह, बालमजुरी यात वाढ झाली असून ती कमी करण्यासाठी जिल्हा परिषद सर्वेक्षण करणार आहे. ती सध्या काय करते? यावर आधारित या सर्वेक्षणातून माहिती संकलित करून मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

यावेळी गणेश चादरे यांनी जिल्हा बालविवाह मुक्त होण्यासाठी निर्धार करण्याची गरज असून जिल्हा राज्यातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा व्हावा अशी अपेक्षा केली. तर गटशिक्षण अधिकारी रोहिणी कुंभार यांनी मुलींना मलाला युसुफ हिचे चरित्र वाचण्याचे तसेच निजाम राजवटीतील प्रिन्सेंस निलोफर यांचे कार्य आदर्श म्हणून समोर ठेवण्याचे आवाहन केले. बालविवाह रोखण्यासाठी मुलींना सक्षम होण्याची गरज असून आपली मानसिक जडणघडण स्वतः घडविण्याचे आवाहन केले. डॉ.कुलदीप मिटकरी यांनी शालेय मुलींनी शाररिक-मानसिक-बौध्दिक विकास याला बालविवाह हा आडथळा ठरू शकतो. बालविवाह झाल्यामुळे मुलींचे अपरिपक्व गरोदरपण आणि त्यामुळे अपरिपक्व बालक जन्माला येते. त्यामुळे मुलींनी स्वावलंबी होण्यासह शिक्षित होवून गरिबीवर मात करावी. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मुलींमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी व्हावे, मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखावी, कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन केले.

      या संवाद कार्यशाळेत युनिसेफ, टाटा सामाजिक विज्ञान संस्था या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच आरोग्य, शिक्षण, महिला बालकल्याण या जिल्हापरिषदेच्या विभागांचे विभाग प्रमुख सहभागी झाले होते. यावेळी मुलींना बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी जागरूक राहण्याची शपथ ही देण्यात आली.

 
Top