उस्मानाबाद / प्रतिनिधी कर्नाटक राज्याची राजधानी बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद शहरात शनिवारी दि. 18 डिसेंबर रोजी कर्नाटक सरकारच्या पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला. शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

कर्नाटकातील बेंगळुरू शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी आंदोलन करण्यात आले. कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचा पुतळा जाळला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय अशा घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच आज कर्नाटक राज्याचे अस्तित्व आहे. याचा विचार कानडी लोकांनी करावा, यापुढे जर अशा घटना घडल्या तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 
Top