उस्मानाबाद / प्रतिनिधी-

बँकिंग कायद्यात बदल करून नफ्यात असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाकरिता सरकार दोन वर्षांपासून प्रयत्नात आहे. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात या बदलाचा कायदा पारित करण्यासाठी कार्यसूचीत ठेवला आहे. त्यास विरोध म्हणून गुरुवारी (दि. १६) राष्ट्रीयकृत बँकांतील अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने संपाची हाक देत उस्मानाबाद शहरातील एसबीआय बँकेसमोर निदर्शने केली.

राष्ट्रीयीकृत बँकेतील १० लाख कोटींची बड्या भांडवलदारांची कर्जे गेल्या सात वर्षात विविध कायदे व सवलती देऊन सरकारने माफ केली आहे. बँकांच्या ताळेबंदातून थकीत कर्जाचे प्रमाण अत्यल्प ठेवले आहे. याचा दूरगामी परिणाम जनतेला भोगावा लागणार आहे. त्यामुळे पुढच्या पिढ्या परत गुलामगिरीच्या विळख्यात येतील. यासाठी हा संप सर्व जनतेच्या हितासाठी असून सरकारचे खासगी क्षेत्राला सरसकट प्राधान्य देण्याच्या धोरणाचा विरोध सर्व स्तरातून होणे आवश्यक आहे. यासाठी दोन दिवस देशातील बँक कर्मचारी, अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनाची सुरूवात म्हणून दोन दिवसाच्या संपाची हाक देण्यात आली आहे. सरकारने या निर्णयाचा फेर विचार न केल्यास बँक कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतील. या लढ्याला सर्व जनतेने पाठिंबा द्यावा, असे आवाहन आंदोलनाच्या कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियन औरंगाबाद युनिटचे उपाध्यक्ष कॉ. सुनील कुलकर्णी यांनी केले. उस्मानाबाद येथील एसबीआय बँकेसमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. या वेळी उस्मानाबाद शहरातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकेतील कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

 
Top