उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीच्या सतर्कतेमुळे शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा ४८ वर्षीय व्यक्तीशी होणारा विवाह रोखता आला. हा प्रकार शहरात मुळजरोड लगत असलेल्या उर्दू शाळेच्या परिसरातील ही घटना आहे.याबाबत उस्मानाबाद जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीचे सदस्य सचिन िबद्री यांनी सांगितले की, आतापर्यंत ६० बालविवाह रोखण्यास यश आले आहे. 

समितीचे सदस्य सचिन बिद्री यांना गोपनीय सूत्राकडून मुळजरोड लगत असलेल्या उर्दू शाळेच्या जवळ एका १४ वर्षीय मुलीचा विवाह ४८ वर्षीय व्यक्तीच्यासोबत छुप्या पध्दतीने घरातल्या घरात होणार असल्याचे समजले. ही माहिती मिळाल्यावर त्यांनी तहसीलदार राहुल पाटील व पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद आदींना याची माहिती देवून जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांना बोलावून घेतले. त्यानंतर महसूलचे मंडळ अधिकारी दीपक चव्हाण, तलाठी एस ए माचन्ना, उत्तर बिट अंमलदार बालाजी कामतकर, पोलिस नाईक लक्ष्मण शिंदे तातडीने मुळजरोड येथे उपस्थित झाले. सदरचा बालविवाह रोखण्या संदर्भात चर्चा करून संबंधित घराचा शोध घेण्यास सुरुवात झाली असताना एका घरासमोर दोन बकरी आढळून आल्या. त्यावर संबंधित घरात विचारणा करण्यात आली असता त्या कुटूंबातील महिलेने सांगितले की, माझ्या मुलीचा विवाह जुळविण्याचा कार्यक्रम असल्याचे सांगितले. टीमने घरात जाऊन पाहिले असता एक अल्पवयीन मुलगी कपाळास कुंकू, हातात बांगड्या भरून सजून बसल्याचे दिसून आले. पोलिस नाईक लक्ष्मण शिंदे, मंडळ अधिकारी श्री चव्हाण, मुख्याध्यापक श्री. मोरे यांच्यासह समितीचे सदस्य सचिन बिद्री यांनी मुलीचे आयुष्य उद्धवस्त करू नका असे समुपदेशन करण्यात आले. नियोजित बालविवाहातील नवरदेव हा मुलीचा भावजी असून त्याचा हा तिसरा विवाह होणार होता. यापूर्वी दोन विवाह झाले असून दोन्ही पत्नीचा मृत्यू झाला असून तर त्यापैकी एका पत्नीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

मुलीच्या आईनेच हा विवाह जुळविण्याचा घाट घातला असल्याचे आले. संबंधितांकडून लेखी हमीपत्र घेत उपस्थित पाहुणे मंडळींनीच्या समक्ष पंचनामा करून सह्या घेत नियोजित बालविवाह रोखण्यात यश आले.

 
Top