उस्मानाबाद/ प्रतिनिधी-

  मुंबई येथील ग्रंथालीच्या वतीने प्रकाशित व भाग्यश्री रवींद्र केसकर लिखित ‘उन्हानं बांधलं सावलीचं घर’ या काव्यसंग्रहास शब्दकळा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शब्दकळा साहित्य संस्थेचे अध्यक्ष प्रा. शशिकांत जाधव यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. यापूर्वी भाग्यश्री केसकर यांच्या काव्यसंग्रहास दोन राज्यस्तरीय आणि एक अखिल भारतीय पातळीवरील पुरस्कार मिळाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील शब्दकळा साहित्य संघाच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार बहाल केले जातात. पुरस्काराचे हे एकविसावे वर्ष आहे. कोरोना कालावधीत पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला नव्हता. त्यामुळे यंदा मागील दोन वर्षातील साहित्य कृतींचा शब्दकळा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव केला जात आहे. रविवार नऊ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवेढा येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमास पंढरपूर येथील ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक वामनराव जाधव यांच्यासह आमदार समाधान अवताडे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत आदींची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती शब्दकळा संघाचे अध्यक्ष प्रा. शशिकांत जाधव यांनी दिली आहे. ‘उन्हानं बांधलं सावलीचं घर’ हा भाग्यश्री केसकर यांचा पहिलाच काव्यसंग्रह आहे. लातूर येथील डॉ. बाबासाहेब अकादमी, उमरगा येथील परिवर्तन संस्थेचा राज्यस्तरीय तर बडोदा येथील अखिल भारतीय स्तरावरील पुरस्कार या पुस्तकाला मिळाला आहे. कोपरगाव येथील भि. ग. रोहमारे ट्रस्टने उल्लेखनीय ग्रंथ म्हणूनही या काव्यसंग्रहाची दखल घेतली आहे. मंगळवेढा येथील पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भाग्यश्री केसकर यांचे अभिनंदन केले जात आहे.

 
Top