परंडा / प्रतिनिधी  

 मराठवाड्यातील औद्योगीक, कृषी आणि ग्राम विकासाला चालना देणारा पार्डी ते भिगवण भाई उद्धवराव पाटील ग्रामसमृद्धी चार पदरी मार्ग बनविण्यात यावा, अशी मागणी केंद्रिय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.

हा मार्ग पार्डी, भूम, वालवड, वाल्हा, अनाळा, इनगोंदा, हिंगणगाव (खु), देऊळगाव, गोसाविवाडी, आलेश्वर, करंजा, करमाळा, राशीन, भिगवण असा झाल्यास या मार्गावरील ग्रामीण बाजारपेठ सुधारेल. तसेच मार्गातील ग्रामदैवत कमलाई देवी करमाळा, राशीनची देवी, भूमचे अलमप्रभूमंदिर, सोनारीचे भैरवनाथ मंदिर, डोमगाव राममंदिर, डोंजा रेणुकाम ता आदिसह वालवड, अनाळा येथील तिर्थस्थळाचा विकास होऊन पूणे व मुंबई बाजारपेठ शेतकरी वर्गाला जवळ होणार आहे. सीना कोळगाव धरणाच्या भोवती वीज, रस्ता आणि मुबलक पाणी यामुळे स्थानिक रोजगारामध्ये वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे २५ नोव्हेंबर रोजी लातुर दौऱ्यावर होते. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार ठाकुर यांचे पार्डी-भिगवण चारपदरी रस्ता मागणीचे पत्र भाजपाचे जिल्हाध्यक्षनितीन काळे, अॅड. मिलिंद पाटील, जि.प. अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, माजी जि. प. अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले. यावेळी विधान परिषदचे आ. रमेश कराड, भाजपा जिल्हा संघटक विकास कुलकर्णी, केशव गाढवे, अभिजीत गाढवे उपस्थित होते. सदर मागणीमुळे सकारात्मक विचार करून नितीन गडकरी यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचे रस्ते विकासासाठी बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

 
Top