उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व पोलीस आयुक्तालयात ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष’ (ए.एच.टी. सेल) कार्यरत असून या कक्षामार्फत वेश्या व्यवसाय, मानव तस्करी, दिर्घकाल बेपत्ता व्यक्ती अशा स्वरुपाच्या घटनांचा / गुन्ह्यांचा तपास केला जातो. गोडी गुलाबीने, फुस लाउन, प्रेम विवाह, रोजगार, मनोविकलांग व्यक्ती, निराश्रीत बालके इत्यादी कारणातून प्रामुख्याने अल्पवयीन मुली, महिला काही प्रसंगी मुलांनाही वेश्या, भिक्षा, मानवी अवयव तस्करी इत्यादी व्यवसायात ढकलले जात असून अशा स्वरुपाचे अनैतिक व्यवसाय हे गाव पातळी पासून आंतरराष्ट्रीय बाजारापर्यंत पसरलेले आहेत. उस्मानाबाद पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षामार्फत अशा प्रकरणांत अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायदा- 1956 अंतर्गत कारवाई करण्यात येउन बालके, वेश्या यांची मुक्तता करण्यात येउन त्यांची रवानगी सुधारगृहात केली जात आहे.

दैनंदिन जीवनात आपणास उपरोक्त स्वरुपाचे अनैतिक व अवैध व्यवसाय समाजात होत असल्याचे आढळल्यास त्या संबंधीची सविस्तर माहिती आपण नमूद कक्षास, नजीकच्या पोलीस ठाण्यास किंवा उस्मानाबाद पोलीस नियंत्रण कक्षाच्या 02472- 222700, 222900 या दूरध्वनी क्रमांकावर  कळवावी. जनतेच्या या छोट्याशा निरीक्षणातून, कृतीतून एखाद्या व्यक्तीचे उध्वस्त जीवन पुन्हा फुलू शकते. असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलातर्फे मा. पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन यांनी जनतेस केले आहे.

 
Top