उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणालाच दोघांनी चिडून लोखंडी गजाने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा सोलापूरयेथे उपचार सुरू असताना रविवारी दि. 21 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मृत्यू झाला. शुक्रवारी दि. 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास मारहाणीची घटना घडली होती. दरम्यान, जखमी तरूणाचा मृत्यू झाल्याची माहिती उस्मानाबाद शहरात समजताच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीसांनी तातडीने शिवाजी चौक व मदिना चौकात पोलीस बंदोबस्त लावला असून दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले आहे. 

पोलीसांनी सांगितले की, उस्मानाबाद शहरातील शिवाजी चौकातील वडार गल्ली येथे शुक्रवारी दि. 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास राहुल मरगू मंजुळे व रोहित हणमंत जाधव हे दोघे एका व्यक्तीसोबत भांडण करत होते. यावेळी मदीना चौक येथील मोहसीन पठाण (वय 31) यांनी ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता राहुल मंजुळे व रोहित जाधव या दोघांनी चिडुन मोहसीन पठाण यांना लोखंडी गज, दगडाने मारहाण करुन, गंभीर जखमी केले होते. जखमी मोहसीन यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील गंगामाई हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना मोहसीन पठाण यांचा रविवारी दि. 21 नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मृत्यू झाला. मारहाणीत जखमी झालेल्या मोहसीन पठाणचा मृत्यू झाल्याची माहिती उस्मानाबाद शहरात समजताच वडार गल्ली व मदिना चौक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीसांनी तात्काळ शिवाजी चौक व मदिना चौक येथे पोलीस बंदोबस्त ठेवला. दंगल नियंत्रण पठकही तैनात करण्यात आले. पोलीसांनी मारेकरी राहुल मंजुळे व रोहित जाधव यांना तातडीने अटक केली. आरोपींना अटक झाल्याने सध्या शहरात तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे. पोलीसांनी सुरूवातीला आरोपींच्या विरोधात भा.दं.सं. कलम- 326, 504, 506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. आता जखमीचा मृत्यू झाल्याने 302 कलम वाढविण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकर सुर्वे करीत आहेत.

भांडण झालेले तरूण वेगवेगळ्या समाजाचे असून मारहाणीत जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपींवर कठोर कारवाई करावी म्हणून मयत झालेल्या तरूणाचे नातेवाईक पोलीसांवर दबाव वाढवत होते. पोलीसांनी आरोपींना तात्काळ अटक केल्याने तणाव कमी झाला. शहर ठाण्याच्या पोलीसांनी शिवाजी चौक व मदिना चौकात बंदोबस्त ठेवला आहे. सध्या या दोन्ही भागात शांतता आहे.

 
Top