उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आज अखेर एकूण 72 हजार 962 लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी दि.20 ऑक्टोबर 2021 पर्यंत 71 हजार 302 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. त्यापैकी 70 हजार 318 शेतकऱ्यांचे कर्ज खात्यावर रक्कम 508 कोटी 98 लाख रुपये जमा करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्याकरिता आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. दि. 20 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्ह्यातील एक हजार 660 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे.

 या योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्या आणि ऑनलाईन तक्रार दाखल केलेल्या शेतकऱ्यांसाठी दि. 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येऊन या योजनेचे कामकाज करावे. तरी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही अशा शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे आणि योजनेचा लाभ घ्यावा. तसेच, ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी आधार प्रमाणीकरण करतेवेळी ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे, अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या तालुक्यातील तहसीलदार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून तक्रारीचे निराकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे.


 
Top