स्थानिक सत्ताधारी, लोकप्रतिनिधी त्रिकूट ठरावीक अर्थकारणात गुंतल्याचा आरोप


उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले.जनतेने आपलं मानल. याबदल मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनी नागरिकांचे आभार व्यक्त केले. परंतु शिवसेनेला भरभरून देऊन देखील उद्धवजीनी उस्माबादकरांना आपल का मानल नाही ? हा खडा सवाल आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केला. तसेच स्थानिक सत्ताधारी लोकप्रतिनिधी त्रिकूट हे केवळ ठरावीक अर्थकारणात गुंतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

शिवसेनेला तीन आमदार व एक खासदार दिल्यानंतर उस्माबादकरांना मुख्यमंत्र्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. या दोन वर्षात जिल्हावासीयांच्या अनुषंगाने अति महत्वाचे प्रकल्प रखडून ठेवण्यातच शिवसेनेला धन्यता वाटली आहे. अडीच हजार एकराच्या कौडगाव एमआयडीसीमध्ये घोषीत 10 हजार रोजगार निर्मिती क्षमतेचा टेक्नीकल टेक्स्टाईल पार्कचा प्रस्ताव दोन वर्ष शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पडून आहे. उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर या रेल्वे मार्गासाठी खर्चाचा 50 टक्के हिस्सा कबूल करूनदेखील एक रुपयाही न देण्याची भूमिका शिवसेना नेते व परिवहन मंत्री यांनी घेतली आहे. केंद्र सरकारकडे तुळजापूर शहराचा प्रशाद योजने अंतर्गत समावेश करण्याचा प्रस्ताव अनेक महिन्यांपासून राज्याचे पर्यटनमंत्री यांच्याकडे प्रलंबित आहे. खरीप 2020 च्या पीक विम्याबाबत वारंवार मागणी करूनही कृषी मंत्री यांनी बैठक बोलावलीच नाही.25 जानेवारी 2021 नंतर जिल्हा नियोजनची बैठकच न घेणारे शिवसेनेचे सहयोगी आमदार व उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख हे तर शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या पिक विम्यांबाबत साधी बैठकही घ्यायला तयार नाहीत.

स्थानिक सत्ताधारी लोकप्रतिनिधी त्रिकूट हे केवळ ठरावीक अर्थकारणात गुंतलेले आहे. इंधन दरवाढीबाबत शिमगा करणारे महाविकास आघाडीचे घटक पक्ष हे केंद्र सरकारने दर कमी केल्यानंतर राज्य सरकारला आपला हिस्सा कमी करा हे सांगण्यासाठी तोंड ही उघडत नाहीत. राज्यात दारूवरचा कर कमी होतो. पण शेतकर्‍यांना पूर्ण अनुदान मिळत नाही, हक्काच्या पिक विम्याचा अजूनही पत्ता नाही. त्यात आता महावितरणच्या माध्यमातून वसुलीची नवीन मोहीम शेतकर्‍यांच्या जीवावर उठली आहे.वारंवार पाठपुरावा करून देखील हे सर्वच मंत्री कुठलाच प्रतिसाद देत नाहीत, हे आपल्या जिल्ह्याचे मोठे दुर्भाग्य आहे. अशा निष्टुर व अकार्यक्षम महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध करत उरल्या सुरल्या दिवसात तरी सुधारा असा सल्ला आ. पाटील यांनी दिला आहे. 


 
Top