तुळजापूर / प्रतिनिधी -

तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात भीक मागणाऱ्या अल्पवयीन गरोदर मुलीची तुळजापूर पोलिसांनी शुक्रवारी (दि.१२) चौकशी केली.

दरम्यान, या अल्पवयीन मुलीचे लग्न झालेले असून, तिच्याकडे आधार कार्ड, जन्म तारखेचा दाखला किंवा इतर कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्याने वय पटवणे कठीण झाले आहे. दरम्यान, सदर मुलीच्या वैद्यकीय तपासणीनंतर चित्र स्पष्ट होणार असल्याचे पोलीस निरीक्षक आजिनाथ काशिद यांनी सांगितले आहे.

सामाजिक कार्यकर्ते संजय बोंदर यांनी तुळजाभवानी मंदिर परिसरात अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक निवा जैन यांच्याकडे तक्रार केली होती. शुक्रवारी सकाळी पोलीसांनी सदर मुलीचा शोध घेऊन चौकशी केली असता तिचे लग्न झाले असल्याचे समजले. तिचा नवरा ऊस तोडणीला तर सासू-सासरे बाहेरगावी गेले असल्याने तिच्यासोबत काेणीच नाही. शिवाय शिक्षण नसल्याने शाळेचा दाखला नाही,आधार कार्ड नाही, यामुळे वय पटवणे मुश्किल झाले आहे. दरम्यान सदर मुलीकडे खासगी दवाखान्याचा प्रेग्नसी रिपोर्ट असून, या प्रेग्नसी रिपोर्टवर तिचे वय १९ नोंदविण्यात आले आहे. असे असले तरी वैद्यकीय तपासणीअंती चित्र स्पष्ट होणार आहे.

 
Top