उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशातील सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य समता व मार्गदर्शक तत्व प्रदान केलेली आहेत. संविधानातील कलम १३ नुसार देशातील विषमता नष्ट केलेली आहे. तर स्त्रियांना दिलेले अधिकार पुरुष मंडळींना खूपत असल्यामुळे आरएसएस, भाजपासह काही पितृसत्ताक मानणारी पुरुष मंडळी छुप्या मार्गाने संविधानाला विरोध करीत आहेत. तर संविधान व संविधानाची उद्देशिका तसेच बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर यांचे विचार हे भारतीय नागरिकांचा आत्मा असल्यामुळेच त्याची जनजागृती करून परिवर्तन करण्यासाठी गावागावात पारायणे व जागरण करणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन प्रा. डी.डी. मस्के यांनी दि.२६ नोव्हेंबर रोजी केले.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने संविधान दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संविधान जनजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भन्तेजी गोविंदो मनदो, वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा ऍड. जिनत प्रधान, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिलीप आडे, महासचिव बाबासाहेब जानराव, ज्योती लोखंडे, सोमनाथ नागटिळक, सुजाता सुजाता बनसोडे, रुक्मिणी बनसोडे, भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष शिलाताई चंदनशिवे, आर.एस. गायकवाड, सुशील बनसोडे, विद्याताई वाघमारे, बालिका सावंत, उमाजी गायकवाड, प्रशांत शिंदे, शिवाजी कांबळे, जिल्हा प्रवक्ते प्रा.के.टी. गायकवाड आदी उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा मस्के म्हणाले की, घटना तयार करताना प्रत्येक शब्द सभागृहातील सदस्यांच्या मतदानाच्या माध्यमातून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेला आहे. त्यासाठी सभाग्रहात यावर प्रचंड वादंग निर्माण होत होते. मात्र डॉ आंबेडकरांनी सभागृहाला ते मुद्दे व शब्द पटवून देत देशातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी अतिशय कष्टपूर्वक संविधान तयार केले आहे. या घटनेच्या माध्यमातून सर्वांनाच मूलभूत अधिकारासह मार्गदर्शक तत्व आदी देशवासीयांना मिळालेली आहेत. मात्र विद्यमान राजकीय मंडळी समान नागरी कायदा करायचा अशी आवई आणत असली तरी विवाह, घटस्पोट व वारसा हक्क यास हीच मंडळी प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवाजी कांबळे, ऍड जिनत प्रधान, दिलीप आडे,  गोविंदो मनदो यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रथमतः उपस्थितांच्या हस्ते संविधान व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. सूत्रसंचालन विद्यानंद वाघमारे यांनी तर उपस्थितांचे आभार दिलीप आडे व अनुराधा लोखंडे यांनी मानले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top