उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील प्रभाग क्र. १६ मधील विविध कामे वर्षानुवर्षे पूर्ण होत नसल्यामुळे येथील नागरिकांना त्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये रस्ते व नाल्यांची देखील कसलीच सोय नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यासाठी महिला व जेष्ठ नागरिकांनी नगर परिषदेमध्ये अनेकदा जाऊन हे प्रश्न सोडविण्याची मागणी केली. परंतू समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे तेही हतबल झाले. त्यामुळे येथील युवा कार्यकर्त्यांनी हा प्रश्न उचलून धरत सतत वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यात हद्दवाढ भागातील ओम नगरच्या प्रलंबित व मूलभूत विकास कामांना हात घातला. नाली व रस्ते कोणत्याही प्रकारे व्यवस्थित नसल्याचे सांगितले.  सुशीला नगर व जवाहर कॉलनी भागातील रहिवाशांची दयनीय अवस्थेचा प्रश्न युवकांनी सतत नगर परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उचलून धरला. गणेश नगर मधील दक्षिण भागातील प्रलंबित रस्ते व नाल्यांची कामे कधी होणार ? याची उत्तरे सतत प्रशासनाला मागितली.

 सध्याच्या येणाऱ्या पुढील कामांच्या यादीमध्ये ही कामे पूर्णत्वास लागण्याची शक्यता नागरिकांच्या वतीने सांगितली जात आहे. कारण वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या समस्या शासन व प्रशासनामार्फत मार्गी लावण्याचे कार्य सध्या चालू झाले आहे असे दिसत आहे. युवकांनी प्रभागाच्या विकासासाठी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे कामांना अल्पशा प्रमाणात का होईना सुधारणा होत असल्याचे चित्र दिसत आहे नगरपालिकेमार्फत ओम नगर मध्ये खराब झालेल्या रस्त्यांवरती मुरूम टाकण्यात आला व तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण रस्ता सुरू झाला. याबद्दल युवकांनी नगर परिषद सदस्य व नगर परिषद कार्यालय यांचे शतशः आभार मानले. 

या भागातील विकास कामे लवकरात लवकर केली जातील असा विश्वास नागरी कृती समितीचे बाळकृष्ण साळुंके यांनी नागरीकांना दिला.  या कामांसाठी कृष्णा घोलप, शुभम पडवळ, सलमान सय्यद, विनय खारके, शिवाजी सुरवसे, शिवाजी शेटे, खय्युम सय्यद, प्रतिक मगर, सुमित जनराव, नितीश शिंदे या युवकांच्या समवेत ओम नगर नागरी कृती समिती, गणेश नगर नागरी कृती समिती व सुशीला नगर नागरी कृती समिती हे सतत पाठपुरावा करीत आहेत.

 
Top