उस्मानाबाद / प्रतिनिधी-

माताबाल संगोपन व नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत उस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम आला आहे. जिल्ह्याने सर्वाधिक ८३ गुण प्राप्त केले आहेत.

पुणे कुटुंब कल्याण कार्यालयामार्फत माताबाल संगोपन आणि नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत विविध निर्देशांकांच्या कामाचे जिल्हानिहाय मुल्यमापन करुन जिल्ह्यांचा गुणानुक्रम ठरविण्यात येतो. सप्टेंबरअखेर झालेल्या कामाचा मुल्यमापन अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालातील गुणनुक्रमानुसार उस्मानाबाद जिल्हा राज्यामध्ये ८३ गुण मिळवुन प्रथम क्रमांकावर आला आहे.

सध्या सर्वत्र कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दररोज कामकाज करत असताना आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांनी माताबाल संगोपन आणि नियमीत लसीकरण कार्यक्रमांच्या विविध निर्देशांकामध्ये चांगली कामगिरी केली आहे. माता आरोग्य कार्यक्रम, बाल आरोग्य कार्यक्रम, नियमित लसीकरण कार्यक्रम इत्यादी नॉन-कोविड कार्यक्रमात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंस्फुतीने दिलेल्या उद्दिष्टानुसार त्यांनी काम प्रामाणिपणे केले. यामुळे हे यश मिळाले आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी आरोग्य कौतुक केले आहे.


 
Top