कारखाना चालविण्यासाठी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने जिल्हा बँकेकडून पुन्हा फेरनिविदा, भाडेही केले कमी


उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मराठवाडा विभागातील पहिला असलेला, सध्या 312 कोटीचे कर्ज असलेला व अवसायनात असलेला ढोकी (ता. उस्मानाबाद) येथील तेरणा सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने यापुर्वी अनेकावेळा निविदा मागविल्या होत्या. परंतू कारखाना भाडेतत्वावर घेण्यासाठी कारखानदारांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे जिल्हा बँकेने फेरनिविदा काढल्या असून निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत 24 नोव्हेंबर आहे. दरम्यान, बँकेने दरवर्षी ठरविण्यात आलेले भाडेही कमी केले असून गाळपाला आलेल्या ऊसाला प्रतिटन टँगिंगचाही दर कमी केला आहे.

ढोकी येथील तेरणा साखर कारखाना 2007 मध्ये सत्तांतर होऊन विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या ताब्यात आला होता. त्यापुर्वी हा कारखाना माजीमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या ताब्यात होता. 2012 पासून कारखाना बंद अवस्थेत आहे. कारखान्याच्या मालकीची कोट्यावधी रुपये बाजारभाव असलेली 143 एकर जमिन आहे. यापैकी 105 एकरावर कारखाना व इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. कारखान्याचे एक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित विद्यालय आहे. कारखान्याकडे जिल्हा बँकेचे जवळपास 312 कोटी रुपयांचे कर्ज आहे. कामगारांची कोट्यावधी रुपयांची देणी थकीत आहेत. याशिवाय केंद्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे देणे थकीत आहे. ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी, वाहतूक ठेकेदार यांचीही देणी थकीत आहेत. एकंदर पाहता तेरणा कारखान्यावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज असल्याने शासनाने हा कारखाना अवसायनात काढून कारखान्यावर अवसायकाची नेमणूक केलेली आहे. केंद्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने तेरणा कारखाना सील केला होता. त्यामुळे हे प्रकरण जिल्हा बँकेने न्यायालयात दाखल केले होते. परिणामी तेरणा भाडेतत्वावर देण्यासाठी विलंब लागत होता. न्यायालयात हे प्रकरण तडजोडीने मिटल्याने तेरणा भाडेतत्वावर देण्याचा मार्ग मोकळा झाला असून जिल्हा बँकेने निविदा मागविल्या आहेत.

26 ऑगस्ट रोजी जिल्हा बँकेने तेरणा भाडेतत्वावर देण्यासाठी निविदा मागविण्याची जाहीरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार राज्यातील अनेक कारखाने, कंपन्यांनी तेरणा कारखान्याची पाहणी केली होती. त्यामध्ये एस.बी.पाटील शुगर दौंड, लक्ष्मी ऑरगॅनिक पुणे, राजाराम बापू सहकारी साखर कारखाना इस्लामपूर (जि. सांगली), विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना चिंचोलीराववाडी (लातूर), विलास सहकारी साखर कारखाना निवळी (लातूर), आदी कारखाऩ्यांच्या अधिकार्‍यांनी तेरणाची पाहणी केली होती. प्रत्यक्षात मात्र मेयर कमोडीज प्रा. लि. मुंबई, ट्वेटीवन शुगर प्रा.लि. मुंबई, डीडीएन एसएफए प्रा.लि. मुंबई, भैरवनाथ शुगर (सोनारी) या कारखान्यांनी निविदा खरेदी केल्या होत्या. भैरवनाथ शुगरने साडेपाच कोटी बयाना रक्कम भरून निविदा दाखल केली होती. परंतू जिल्हा मध्यवर्ती बँकेने किमान अपेक्षित भाडे व अपेक्षित व्हेरिएबल रक्कम न मिळाल्याने पुन्हा फेरनिविदा काढण्याचा निर्णय बँकेने घेतला. तेरणा भाडेतत्वावर घेण्याच्या प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने जिल्हा बँकेने पुन्हा फेरनिविदा मागविल्या आहेत.

तेरणा कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन 5 हजार मेट्रीक टन असून डिस्टीलरी क्षमता 50 केएलपीडी आहे. देशी दारु उत्पादन क्षमता (सीएल-आय) 2000 केसेस प्रतिदिन आहे. 1 ते 4 थे वर्ष प्रतिवर्ष दोन कोटी भाडे, 5 व्या वर्षापासून करार संपेपर्यंत (25 वर्षे करार) प्रतिवर्ष 6 कोटी भाडे किमान अपेक्षित भाडे रक्कम ठरविण्यात आली आहे. प्रतिटन ऊस गाळपावर 1 ते 3 वर्ष 75 रुपये, 4 थ्या वर्षापासून 81 रुपये करार संपेपर्यंत टॅगिंग वसुली करण्यात येणार आहे. 

अशी आहे निविदा प्रक्रिया

निविदा फॉर्म विक्री ः 12 ते 20 नोव्हेंबर

निविदा फॉर्म फीस ः 50  हजार (9 हजार जीएसटी वेगळा)

मालमत्ता पाहणी कार्यक्रम ः 12 ते 20 नोव्हेंबर

प्रि -बीड मिटींग ः 20 सप्टेंबर

निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख ः 24 नोव्हेंबर

निविदा उघडण्याची तारीख ः 25 नोव्हेंबर

 
Top