उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला शासननिर्णय अखेर मंगळवारी जारी करण्यात आला आहे. यामध्ये अतिवृष्टीने बाधित जिल्ह्यातील चार लाख ४५ हजार ५४५ शेतकऱ्यांना २३७ कोटी ६० लाख रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे दिवाळीपूर्वी मदत मिळण्याची आशा वाढली असून, आता बँकेच्या स्तरावर जलद प्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे.

ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये नुकसानभरपाईपोटी ३१६ कोटी ८१ लाख रुपये मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पाठवला होता. यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात ७५ टक्के रक्कम देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये २३७ कोटी ६० लाख रुपये निर्गमित करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाला कोषागार कार्यालयातून प्रक्रिया करून बँकांकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच यामध्ये संबंधित शेतकऱ्यांची यादी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. दिवाळीपूर्वी मदत मिळण्याची आशा निर्माण झाली असून, आता तातडीने रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी वेगाने बँक स्तरावर प्रक्रिया करण्याची गरज आहे.

ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निकषाबाहेर जाऊन ३१६ कोटींची मदत जाहीर केली होती. यातील २३७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत करण्याचे आदेश मंगळवारी निगर्मित केले. एसडीआरएफच्या निकषानुसार २१७ कोटींची मदत देय होती. त्यात राज्य शासनाने ९९.४६ कोटींचा वाढीव निधी घातला. याप्रमाणे जिल्ह्यातील ४,५५,४०६ शेतकऱ्यांना ३१६.८१ कोटी रुपये मदत मिळणार आहे. यातील २३७.६० कोटी वितरणास लागलीच सुरुवात होत आहे. ठाकरे सरकारने दिवाळीपूर्वीच शेतकरी बांधवांना मदत देण्याचा शब्द पाळला आहे, असे अामदार कैलास पाटील यांनी सांगितले. 


 
Top