उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मराठवाडा व परिसरात कमी पाऊस असतो परंतू गेल्या कांही दिवसात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी बंधुच फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. राज्य सरकार ने कॅबीनेट बैठक घेऊन युध्दपातळीवर शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. 

खासदार छत्रपती संभाजीराजे बुधवार दि. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी उस्मानाबाद जिल्हयात आले. त्यांनी दाऊतपुर, इर्ला आणि भर पावसात रामवाडी येथे भेटी दिल्या. पुरात वाहून गेलेल्या कांबळे परिवाराची ही त्यांनी भेट घेतली. पत्रकारांशी बोलताना खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या भागात तातडीच्या मदतीची गरज आहे. मंत्री अथवा अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांची गरज नाही. राज्य सरकार ने एनडीआरफच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करावी, गेल्या वर्षींचा विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही, यावर्षीचा विमा मिळालेला नाही, शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान देऊन मदत केली तरच शेतातली दुर्गंधी कमी होईल, नाहीतर कोरोनाच्या भितीबरोबरच शेतातील दुर्गंधीमुळे शेतकऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल. राज्य सरकार ने एनडीआरएफकडून मोठ्या प्रमाणात मदत मिळविण्यासाठी योग्य पध्दतीने अहवाल सादर करावा व शेतकऱ्यांना मदत करावी, असे सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. धीरज पाटील, रोहित पडवळ, शिवराज्याभिषेक सोहळ्याचे विष्णू इंगळे, आकाश मुंढे, मोसीन पठाण आदी उपस्थित होते. 

 
Top