तुळजापूर  / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देविजींची अश्विन पोर्णिमा यात्रा कोरोना संकटाच्या अनुषंगाने सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे तुळजापूर येथील व्यावसायिकासह भाविकातून नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः यात्रा कालावधीत जिल्हाबंदी करण्यात आली असून तीर्थक्षेत्र तुळजापूर मधून जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे.

श्री तुळजाभवानी देविजींच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील प्रमुख असा अश्विन (कोजागीरी ) पोर्णिमा उत्सव १९ ते २० ऑक्टोबर या कालावधीत साजरा होत आहे. पौर्णिमा उत्सवासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी तुळजापूर येथे गर्दी करतात. पोर्णिमा उत्सवासाठी उस्मानाबाद

लातूर, नळदुर्ग, सोलापूर, उमरगा, हुमनाबाद , गुलबर्गा , बिदर या ठिकाणाहून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या देखील मोठी असते. यंदा मात्र कोरोना संकटाच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थान प्राधिकरणचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन कोजागीरी यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा मात्र भाविकाविनाच देविजींचे पोर्णिमा उत्सवाचे धार्मिक विधी होणार आहेत. पुजारी, सेवेकरी, मानकऱ्यांच्या उपस्थितीत कोजागिरी पोर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.राज्यातील व राज्याबाहेरील सर्व नागरीकांना यात्रेकरीता दिनांक १८ ते २० ऑक्टोबर दरम्यान जिल्हाबंदी असणार आहे. त्यामुळे राज्यातील व राज्या बाहेरील नागरीकांना तुळजापूर शहरात प्रवेश देण्यात येणार नाही. भाविकांना यात्रेकरीता तुळजापूर शहर बंदी असली तरी भाविक तुळजापूरकडे पायी चालत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये या करीता भाविक पायी चालत येणाऱ्या मार्गावरील सर्व प्रकारची वाहने अन्य मार्गाने वळविण्यात आली आहेत. पोर्णिमा यात्रा रद्द झाल्याने भाविकांच्या यात्रोत्सवाच्या आनंदावर पाणी फेरले आहे तर व्यापाऱ्यांना देखील मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे भाविकासह व्यापाऱ्यातून नाराजी व्यक्त होत आहे. पोर्णिमा उत्सवाच्या अनुषंगाने भाविकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला आहे.


 
Top