उमरगा / प्रतिनिधी-

तालुक्यात पोलिस प्रशासनाच्या वतीने दोन दिवसांत सात गावांमधील गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. पोलिसांनी मागील सहा दिवसांपासून अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे.

मागील दोन दिवसांत उमरगा पोलिस ठाण्यांतर्गत गावांमध्ये पोलिस पथकाने उमरगा शहर, तुरोरी, कदेर, मुळज, माडज, बलसूर आणि पळसगांव तांडा येथील गावठी दारू अड्डे, देशी व विदेशी दारू विक्री सुरू असलेल्या सात गावात कारवाई केली. यामध्ये ९८५ लिटर गुळ मिश्रित रसायनासह गावठी दारू, देशी व विदेशी दारूच्या ६५ बाटल्या असा ४९ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून १४ जणांविरुद्ध कारवाई करत नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक निवा जैन, अप्पर पोलिस अधीक्षक नवनीत कामत, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.

चार अधिकाऱ्यांच्या पथकात बीट अंमलदार व पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बनावट बायो डिझेलनंतर पोलिसांनी गावठी दारुविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. उमरगा पोलिस ठाणे अंतर्गत तालुका, परिसरातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी उमरगा पोलिस प्रशासनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलिस उपनिरीक्षक विकास दांडे व पोलिस उपनिरीक्षक रमाकांत शिंदे यांचे पथक तयार केले आहे.

 
Top