उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिरात नियम डावलून प्रवेश करत पूजा केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या अाध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्याविरुद्ध गुरुवारी (दि.७) रात्री उशिरा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

आचार्य तुषार भोसले यांनी गुरुवारी (दि.७) नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारी ११:५८ ते १२:३० च्या सुमारास मंदिर कार्यालयात कोणतीही पूर्वकल्पना न देता राजे शहाजी महाद्वारमधून प्रवेश करत जिल्हाधिकाऱ्यांच्या सामान्य भाविकांना मंदिरात प्रवेश बंदच्या आदेशाचे उल्लंघन केले तसेच कोविडचा प्रसार आणि प्रचार होईल असे निष्काळजीपणा व हयगयीचे वर्तन केले. तुळजाभवानी भवानी मंदिर भाविकांसाठी गुरूवारी सायंकाळी ६ वाजेपासून भाविकांसाठी खुले करण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला होता.

मात्र तुषार यांनी कुटुंबियांसह दुपारीच मंदिरात प्रवेश करत पूजा अर्चा केली.

मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक (स्थापत्य) प्रवीण अमृतराव यांच्या फिर्यादीवरून तुषार भोसले (रा. शालिग्राम, नाशिक) यांच्यासह अन्य व्यक्तींविरोधात भादंवि १०९, १८८, २६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळजाभवानी मंदिरात नियम डावलून प्रवेश करत पूजा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.


 
Top