उस्मानाबाद / प्रतिनिधी-

इंस्टाग्रामवर मुलीच्या नावे बनावट खाते तयार करून अन्य युवकांची अश्लिल संवाद साधत संबंधित मुलींची बदनामी करणाऱ्याला जेरबंद करण्यात आले आहे. याप्रकरणी अंबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

एका तरुणीच्या नावाने इंस्टाग्रामवर दोन बनावट खाती उघडून अनेक तरुणांशी अश्लील संवाद साधला जात होता. यातुन त्या मुलीची बदनामी होत असल्याने तीने अंबी पोलिस ठाणे गुन्हा दाखल केला होता. तपास हा इंटरनेटशी संबंधीत असल्याने या गुन्ह्याच्या तपासकामी सायबर पोलिस ठाण्याची मदत घेण्यात आली. सायबर पोलिसांनी इंस्टाग्रामशी संपर्क साधून त्या खात्यांची माहिती घेतली. खात्यांच्या वापरकर्त्याशी संबधीत दोन मोबाइल क्रमांक प्राप्त झाले.या माहितीच्या आधारे व कळंबचे सहायक पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा ठाण्यातील गिड्डे व अंबीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर, हवालदार गजानन मुळे, पोलिस नाईक सिध्देश्वर शिंदे, हवालदार सतीश राऊत यांच्या पथकाने रोहकल (ता. परंडा, जिल्हा उस्मानाबाद) येथे जाऊन याप्रकरणाची चौकशी केली. यावेळी दिगंबर हनुमंत कांबळे (१९) हा तरुण त्याच्या वडीलांच्या व मामाच्या नावे असलेल्या दोन भ्रमणध्वनी क्रमांकाचा वापर करत असल्याचे समजले. या मोबाइल क्रमांकांचा वापर करत तो इंस्टाग्रामवर खाती हाताळात असल्याचे त्यांना चौकशीत समजले. चौकशीत स्पष्ट झालेल्या तथ्यांच्या आधारे पथकाने त्यास ताब्यात घेउन गुन्ह्यात वापरलेला भ्रमणध्वनी जप्त केला आहे.


 
Top