उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असल्याने जिल्ह्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून सर्व अनुषंगिक सवलती व आर्थिक सहकार्य जिल्हा वासियांना करण्यात यावे अशी मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

महसूल विभागाच्या कार्यप्रणाली अनुसार ३० सप्टेंबरला हंगामी पैसेवारी जाहीर केली जाते. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व ७३७ गावांमध्ये ही पैसेवारी ५० पैशाच्या आत आलेली आहे. खरीप हंगामात सुरुवातीच्या काळात पावसामुळे पडलेला खंड आणि काढणीच्या काळात झालेली अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पिकांचे व शेतीचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. काही मंडळामध्ये अतिवृष्टी झाली नाही म्हणून पंचनामे केले जात नाहीत अशा तक्रारी आल्या होत्या. जेथे नुकसान झाले आहे तेथे पंचनामे करणे अभिप्रेतच आहे व तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. महसूल आणि कृषी यंत्रणा सर्वत्र फिरलेली आहे, नुकसानीची व्याप्ती त्यांना माहित आहे. त्यामुळे अंतिम पैसेवारीची वाट न पाहता जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून राज्य शासनाने सरसकट अनुदान देणे हे नैतिकतेने बंधनकारक आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात तरी दिलासा देण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून अनुषंगिक सवलती व आर्थिक सहकार्य तातडीने करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांच्याकडे आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी मागणी केली.

 
Top