उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी MH25 AV ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. त्यातील पसंती क्रमांक मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते आणि त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो. बऱ्याचवेळा नागरिकांनाही याचा त्रास होतो. नागरिकांचा होणारा त्रास कमी व्हावा आणि त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा, यासाठी ज्या वाहनमालकांना आकर्षक तसेच  पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवे असतील त्यांनी अर्ज आणि डी.डी. दि. 06 ते 08 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 4:00 पर्यंत या कार्यालयात सादर करावेत. एका क्रमांकाचे दोन किंवा अधिक अर्ज प्राप्त झालेल्या अर्जदारांची यादी कार्यालयीन नोटीस बोर्डावर दि. 08 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता प्रसिध्द करण्यात येईल. एकाच क्रमांकाचे दोन किंवा अधिक प्राप्त झालेल्या अर्जांसाठी अर्जदार किंवा प्रतिनिधी यांच्याकडून बंद लिफाफ्यात डी.डी. हे 12 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 : 30 वाजता स्वीकारुन आणि त्यांच्या समक्ष उघडून आकर्षक क्रमांकासाठी लिलाव करण्यात येईल.

अर्जासोबत केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 च्या नियम चार तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम पाच अ मध्ये विहित केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल. (उदा. लाईट बील, टेलीफोन बील आदी) तसेच आकर्षक क्रमांकासाठी देय असलेल्या विहित शुल्काच्या डी.डी.अर्जासह जमा करणे बंधनकारक आहे. डी.डी. फक्त Deputy Regional Transport Officer, Osmanabad यांच्या नांवे केवळ Nationalize  बँकेचा असावा. या व्यतीरिक्त इतर नावाचे डी.डी. अवैध ठरवले जातील. तसेच डी.डी. व्यतीरिक्त बँकेने जारी केलेले बँकर्स चेक स्वीकारले जाणार नाहीत. डी.डी. कमीत कमी एक महिना मुदतीमधील असावा.

एकाच नंबर करिता एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्यांची यादी कार्यालयीन नोटीसबोर्डावर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांना लिलावाकरिता जर अतिरिक्त रक्कमेचा डी.डी. जमा करावयाचा असेल तर त्यांनी वर नमुद केल्याप्रमाणे सीलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावा. लिलावासाठी सादर केलेला अतिरिक्त रक्कमेचा डी.डी. 300 रुपये पेक्षा कमी नसावा. अतिरिक्त रक्कमेचे संबंधित अर्जदारांकडून प्राप्त झालेले डी.डी.चे लिफाफे अर्जदार किंवा प्रतिनिधी यांच्या समक्ष आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत उघडले जातील. ज्या अर्जदाराने अधिक रक्कमेचा डी.डी.सादर केला असेल त्यास सदरचा पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या  दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करुन वाहन क्रमांक प्राप्त करुन घ्यावा. अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल आणि फी शासनजमा होईल. कोणताही  विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही.

आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज तसेच प्रतिनिधी येणार असल्यास प्रतिनिधीचे प्राधिकारपत्र याचा नमुना कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध आहे. तरी लवकरात लवकर पसंती क्रमांकासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन उस्मानाबाद येथील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव यांनी केले आहे.

 
Top