उमरगा / प्रतिनिधी-

नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांना अपात्र ठरविल्यानंतर नवीन नगराध्यक्ष निवडीचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी गुरुवारी पत्राद्वारे पालिका प्रशासनास दिले. त्यानुसार ८ ऑक्टोबर रोजी पालिका सदस्यातून नवीन नगराध्यक्ष निवड करण्यात येणार आहे.

पालिका मुख्याधिकारी यांना दिलेल्या सूचनेत म्हटले आहे की, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ९ सप्टेंबर रोजी उमरगा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रेमलता परमेश्वर टोपगे यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे हे पद रिक्त झाले आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१(३) नुसार नगराध्यक्षाचे रिक्त पद भरण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार सदस्यांमधून अध्यक्ष निवड निवडणुकाद्वारे करण्यासाठी सदस्यांची विशेष सभा ८ ऑक्टोबर रोजी पालिकेत आयोजित करण्यात येईल. या विशेष सभेचे पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी, उमरगा हे काम पाहतील.

यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेला अधिकाऱ्याकडे ४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन दाखल करता येणार असून, त्याच दिवशी दुपारी २ वाजता नामनिर्देशन पत्राची छाननी करून नामनिर्देशन फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांची यादी करणासह सूचना फलकावर सायंकाळी ५ वाजेपर्यंत लावली जाणार आहे. नामनिर्देशन पत्र फेटाळण्यात आलेल्या उमेदवारास ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ६ रोजी सायंकाळी ५ पर्यंत अपील करता येईल. वैध नामनिर्देशित उमेदवारांची यादी ६ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजल्यानंतर प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्यासाठी अर्ज सादर करण्याची वेळ ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत असून ८ रोजी दुपारी साडेबारा वाजता पालिकेच्या सभागृहात पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया व निकाल घोषित केला जाणार आहे.

 
Top