उमरगा / प्रतिनिधी-

उमरगा नगर परिषद मधील पावणे दोन कोटी रुपयाचे अपहारातील भ्रष्ट नगरसेवकांविरुध्द तात्काळ कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने उमरगा नगर परिषदेसमोरील डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शुक्रवारी (दि.१) पासुन आमरण उपोषणला सुरुवात केली आहे.

उमरगा नगर परिषदमध्ये १ कोटी ७५ लाख ४९ हजार ६२८ रुपयाचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर प्रथम दर्शनी दोषी विरुद्ध उमरगा पोलिसांत रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च्य न्यायालयाचे औरंगाबाद खंडपिठाचे आदेशानुसार उमरगा पालिकेचे सन २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ वर्षाचे विशेष लेखापरीक्षण करण्यात आले आहे. यामध्ये कंत्राटी कर्मचारी, लेखापाल, संस्था, कंत्राटदारासह, नगरसेवक दोषी असल्याचे जिल्हा लेखापरीक्षा अधिकारी तथा विशेष लेखा परीक्षण पथकाचे निदर्शनास आले आहे. शहरवासीयांच्या कष्टाच्या टॅक्स रुपातून जमा झालेल्या शासनाचा पैशावर सदर भ्रष्ट नगरसेवक व इतरांनी संगणमतानी डल्ला मारला आहे. ऑडिट रिपोर्टमधील दोषी नगरसेवकाविरुध्द कायद्यातील तरतुदीनुसार फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांचेवर निलंबनाची कार्यवाही व्हावी यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने शुक्रवारी (दि.१) सकाळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून पासून उमरगा नगरपालिकेसमोर अमरण उपोषण सुरुवात करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रदिप जाधव उपाध्यक्ष आण्णासाहेब पवार , कार्याध्यक्ष दादासाहेब बिराजदार , सचिव सचिन आळंगे, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष अनिल सगर, माधव जाधव, पवन जेवळे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्ष सुनंदाताई माने, प्रवक्ता रेखाताई सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष रेखाताई पवार, मिनाक्षीताई दुबे, राऊ भोसले आदीसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 
Top