उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोरोना कालावधीमध्ये राज्य परिवहनच्या कामगारांनी आपला जीव धोक्यात घालून महामंडळाची प्रवासी सेवा वाहतूक दिवसरात्र सुरू ठेवली. कोरोनामुळे महामंडळातील ३०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाले आहेत. राज्यावर नैसर्गीक आपत्ती आलेल्या प्रत्येकवेळी रा.प.कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी प्रथम प्राधान्याने धाव घेतली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शविण्यात येत असल्याचे भाजपने कळविले आहे.

भाजपने म्हटले आहे की, राज्य शासनाच्या प्रत्येक विधायक कार्यामध्ये व राज्याच्या सर्व क्षेत्राच्या विकासामध्ये महामंडळाचा असलेला उस्फुर्त सहभाग याचा विचार करुन राज्य परिवहन महामंडळाला राज्याची रक्तवाहिनी मानले जाते.त्यामुळे इतर काही राज्यामध्ये तेथील परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण केले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनिकरण करुन रा.प.कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषीत करावे. यासह काही प्रमुख मागण्या रा.प.कर्मचारी संघटनांच्या वतीने करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने ३०/०६/२०१८ मध्ये परिपत्रकीय सुचना काढून मान्य केलेले असतानांही अद्यापपर्यंत कामगारांना वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्के व घारभाडे भत्त्याचा दर ८,१६,२४ टक्के लागू केलेला नाही, हे अन्यायकारक आहे. कामगार कराराच्या तरतूदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना लागू होणारा महागाई भत्त्याचा दर रा.प.कर्मचाऱ्यांना मान्य केलेला असतानाही शासन निर्णयनुसार महागाई भत्ता रा.प.कर्मचाऱ्यांना देय झाला नाही. शासन निर्णयाप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता व वरील सर्व भत्ते निर्णयाप्रमाणे लागू करुन सदर रक्कमेची थकबाकीसह अदायी कर्मचाऱ्यांना करण्यात यावी. तसेच शासकीय नियमाप्रमाणे १२५०० रुपये सण उचल व १५००० रुपये दिवाळी भेट दिवाळीपूर्वी देण्यात यावी. प्रमुख मागण्यांसाठी उपोषणास बसलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या पाठिशी भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभा असल्याबाबत भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर व आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषकर्त्यांना आश्वस्त करण्यात आले.तसेच रा.प.कर्मचाऱ्यांच्या बेमुदत उपोषणास भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा दर्शविला. महाराष्ट्रात एस.टी.कामगारांच्या मागण्या सरकारने मान्य करून त्यांना योग्य तो न्याय द्यावा.

 
Top