उमरगा / प्रतिनिधी

उमरगा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी एकुण पाच उमेदवारी अर्जांची विक्री झाली होती.सोमवारी चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यापैकी तीन अर्ज अवैध ठरले असुन एक अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. भाजपाच्या राजेश्वरी स्वामी यांचा अर्ज वैध ठरल्याने पालिकेत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली आहे.

 उमरगा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरणात गरमागरमी सुरू झाली होती. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या नगरपालिका राजश्री स्वामी, शिवसेनेच्या जयश्री चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुबिना अत्तार या तीनच नगरसेविका नगरपालिकेत आहेत. काॅग्रेसचे ८ नगरसेवक असले तरी त्यांच्याकडे या प्रवर्गातील नगरसेवक नाही. भाजपा, सेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  दोन दिवसांपासून वाटाघाटी सुरू होत्या. तर शिवसेनेचे कांही नगरसेवक नगराध्यक्षपद शिवसेनेकडे घेण्यासाठी पक्षश्रेष्ठीना गळ घालण्याच्या प्रयत्नात होते. शिवसेना नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी अर्ज खरेदी केला होता. पण पक्षश्रेष्ठींनी त्यांची समजूत काढली व अर्ज दाखल करण्यापासून परावृत्त केले. तर काॅग्रेसच्या कांही नगरसेवकांनी राष्ट्रवादीला चुचकारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोन नगरसेवकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला पण काॅग्रेससोबत जाण्यासाठी एका नगरसेवकाने केलेला सक्त विरोध व काॅग्रेस - राष्ट्रवादी एकत्र आले तरी काॅग्रेसचा एक नगरसेवक फुटण्याची भिती व यामुळे ही दोस्ती जुळलीच नाही. सोमवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दिवशी भाजपचे प्रभारी नगराध्यक्ष हंसराज गायकवाड व राजेश्वरी स्वामी यांचे प्रत्येकी एक व काँग्रेसच्या नगरसेविका सौ. सविता वाघमारे यांचे दोन अर्ज दाखल झाले होते. दरम्यान सोमवारी सायंकाळी पाच वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिठासन अधिकारी प्रभारी उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, सहाय्यक निर्णय अधिकारी रवींद्र सोनवणे यांनी नगराध्यक्ष पदासाठी हंसराज गायकवाड व सविता वाघमारे हे नगराध्यक्ष पदाच्या राखीव प्रवर्गातील उमेदवार नसल्याने त्यांचे यांचे अर्ज अवैध ठरवले. तर स्वामी यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. अपिलासाठी दोन दिवसाची मुदत असुन शुक्रवारी (दि.८) रोजी अधिकृत घोषणा होणार आहे.

 
Top