उस्मानाबाद / प्रतिनिधी-

एकेकाळी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसमय होता. आता पक्षाची अवस्था पुर्वीसारखी राहीलेली नाही. जिल्ह्यात पक्ष संघटना वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे, पक्ष म्हणून मी लागेल ती मदत करायला तयार आहे, अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेश महासचिव तथा लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी दिली.

आ. धीरज देशमुख शनिवारी दि. 18 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्हा दौर्‍यावर आले होते. प्रारंभी आळणी फाटा येथे काँग्रेसचे युवा नेते तथा सुशीलादेवी देशमुख तालुका नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बालाजी साळुंके यांच्या हस्ते आ. देशमुख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे विधी विभागाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विश्वजित शिंदे, एनएसयुआय चे प्रदेश सरचिटणीस रोहीत थिटे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष समियोद्दीन मशायक, सुधीर अलकुंटे, अजहर पठाण, रशिद पटेल, आसीफ काझी आदी उपस्थित होते. त्यानंतर शिंगोली येथील शासकीय विश्रामधाम येथे आ. देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. यावेळी बैठकीत बोलताना आ. देशमुख यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटना वाढविण्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी पक्ष वाढीचे काम करीत असताना येत असलेल्या अडचणी सांगितल्या. एकेकाळी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता पक्षाची अवस्था पुर्वीसारखी राहीलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात पक्ष वाढविण्यासाठी मदत करण्याचे साकडे आ. देशमुख यांना घातले. यावेळी बोलताना आ. देशमुख म्हणाले तुम्हाला पक्षाचे काम करीत असताना कोणत्या अडचणी येत असतील तर त्या सोडविण्याचे काम करू, प्रामाणिकपणे व तळमळीने पक्षाचे काम करीत असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देऊ, काम करणार्‍या कार्यकर्त्यांची यादी मला द्या, त्यांना पक्ष संघटनेत काम करण्याची संधी देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आगामी काळात जिल्हा परिषदा व नगर पालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या ताकदीने लढण्यासाठी कार्यकर्त्यांना मदत करू, कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी आ. देशमुख यांनी केले. यावेळी बैठकीला काँग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, एनएसयुआय चे प्रदेश सरचिटणीस रोहीत थिटे, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, काँग्रेस विधी विभागाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विश्वजीत शिंदे, विधी विभागाचे मुख्य सचिव अ‍ॅड. गणपती कांबळे, अ‍ॅड. राहुल लोखंडे,  राम पेंढारकर, माजी शहराध्यक्ष समियोद्दीन मशायक, माजी नगरसेवक अ‍ॅड. दर्शन कोळगे, मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आशिष मोदाणी, काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, कार्याध्यक्ष प्रभाकर लोंढे, विनोद वीर, ढोकीचे उपसरपंच अमोल समुद्रे, अयुब शेख, दत्ता तिवारी, स्वप्निल शिंगाडे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top