लोहारा / प्रतिनिधी-

कीर्तनकार, कलावंतांना त्वरित मानधन देण्याच्या मागणीसाठी लोहारा तालुका वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने शुक्रवारी (दि.३) तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, मागील दीड वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामूहिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. कीर्तन, नाटक, अखंड हरिनाम सप्ताह, पारायण सोहळे पूर्णत: बंद आहेत. बहुतांश कीर्तनकार, लोककलावंतांचा उदरनिर्वाह यावरच चालतो. परंतु धार्मिक व इतर कार्यक्रम घेण्यास मनाई केल्यामुळे गायक, वादक, हार्मोनियम वादक, टाळकरी, विणेकरी यासह नाट्य कलावंतांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाउनच्या काळात लोककलावंतांना दर महिन्याला मानधन देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. याला एक वर्ष झाले आहे. त्यामुळे मानधन त्वरित मानधन द्यावे.

 या आंदोलनात महिला कलावंतांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी तहसील प्रशासनाच्या वतीने पेशकार एम. जी. जाधव यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कुंभार, सिंधुताई बडोरे, जयश्री कुलकर्णी, भारतबाई फुरडे, सरस्वती यादव, जिजाबाई कांबळे, अनिता फुरडे, सुनीता घोटाळे, गोकर्णा बिराजदार, सचिन दासीमे, भगवान गरड, सतीश माळी, हरी वाघे, मधुकर भरारे, सदाशिव बिराजदार, शिवाजी बिराजदार, भास्कर मोरे, रवी कोळी, शिवाजी मोरे, तुकाराम काडगावे यांच्यासह कलावंत उपस्थित होते. 

 
Top