उस्मानाबाद / प्रतिनिधी-

देश स्वतंत्र झाला, तेंव्हा मराठवाडा प्रदेश निजामाच्या ताब्यात होता. मराठवाड्यात इंग्रजांपेक्षा निजामांनी अधिक अन्याय अत्याचार केला. त्यांच्या तावडीतून मराठवाड्याला सोडविण्यासाठी प्रकर्षाने लढा उभारणारे क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांचा इतिहास शब्दबध्द व्हावा यासाठी संशोधन व्हावे. त्यांच्या कार्याची माहिती जगासमोर यावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने चर्चासत्र, सरकार दप्तरी नोंदी घेणे व त्यांचे स्मारक उभारावे, अशा विविध मागण्या उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील ७० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे केल्या आहेत.

मराठवाडा मुक्तिसंग्रामात उस्मानाबाद हे निजामाचे केंद्रबिंदू होते. जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्यवीरांनी निजाम राजवट उधळून लावण्यासाठी सशस्त्र लढा उभारला होता. दुर्दैवाने त्यावेळचे अनेक ज्ञात, अज्ञात शूरवीर आजच्या तरूण पिढीला माहिती नाहीत. त्यांच्याबाबतची माहिती, त्यावेळच्या लढ्यांचे प्रसंग, लढ्याचे ठिकाण याचा संपूर्ण इतिहास उलगडून जागतिक पातळीवर पोहोचणे गरजेचे आहे. मुक्तिसंग्रामातील एक स्वातंत्र्यसेनानी म्हणजे मातोळा येथील क्रांतीवीर दत्तोबा भोसले. ज्यांची महती व कर्तबगारी १९४८ सालचे उस्मानाबादचे जिल्हाधिकारी महंमद हैदर यांनी त्यांच्या ‘ऑक्टोबर कोअ्प’ पुस्तकात मांडली आहे. दत्तोबा भोसले हे मुख्य सेनानी होते. जिल्ह्यातील सर्व कॅम्प त्यांनी स्थापन केले व धाडसाने चालवलेही. अशा दत्तोबा भोसले यांची प्रेरणादायी माहिती जगासमोर येणे गरजेचे आहे. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांनी निजामाच्या अन्याय, अत्याचाराविरोधात लढे उभारले. सशस्त्र छावण्या सुरू करून निजामाविरूध्द लढा दिला. त्या काळात देवताळा गावातील थरार, सेलू गावातील हप्ता लूट, नाईचाकूर पोलीस ठाण्यावरील हल्ला सर्वपरिचित आहे.  

या आहेत मागण्या

मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांची माहिती गोळा करून सरकार दफ्तरी नोंद व्हावी, सशस्त्र लढ्यांची माहिती पुस्तिका तयार करावी तसेच शालेय अभ्यासक्रमात धड्यांचा समावेश करावा, क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांचे उस्मानाबाद, लातूर येथे स्मारक उभारावे, शासकीय योजनांना त्यांचे नाव द्यावे, तसेच शासकीय पुरस्कार, क्रीडा संकुल, सभागृह व महामार्गांना त्यांचे नाव द्यावे, अशा विविध मागण्या लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींनी केल्या आहेत. यात उजनी, आशीव, एकंबी, लोहारा खुर्द, मातोळा, आळणी, माकणी, पाटोदा, बेंडकाळ, भंडारा, जवळगा (पो.), संक्राळ व अन्य ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

 
Top