प्रतिनिधी/बार्शी -

 निसर्गाचा लहरीपणा, मजूर टंचाई, लॉकडाऊन मुळे अनिश्चित बाजारभाव व निर्यातीवरील निर्बंध यांमुळे शेतकरी सध्या आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आला आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी फळबागांमधूनच शेतकर्‍यांना शाश्वत उत्पन्नाची संधी आहे, असे प्रतिपादन एनएमके-1 गोल्डन या सीताफळ वाणाचे जनक, प्रख्यात कृषी संशोधक डॉ. नवनाथ कसपटे यांनी केले. ते मधुबन फार्म व नर्सरी, लायन्स क्लब बार्शी टाउन व अखिल भारतीय सीताफळ महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सीताफळ उत्पादन तंत्रज्ञान व विपणन प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी फलटणचे पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, लायन्स क्लब बार्शी टाऊनचे उपाध्यक्ष अमित कटारिया, सचिव रवी राऊत, माणिक हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. कसपटे यांनी यावेळी सीताफळ रोपे लागवड, पिकातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, बहराचे नियोजन आणि फळांची तोडणी व त्यानंर घ्यावयाची काळजी म्हणजेच हाताळणी  व पॅकिंग याविषयी सखोल मार्गदर्शन करत सर्व शेतकर्‍यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन शंका निरसन केले
कृषी विस्तार, प्रक्रिया व निर्यात तज्ञ डॉ. संजय पांढरे यांनी एक जिल्हा एक पिक या योजनेविषयी व सीताफळ प्रक्रिया व अन्य उत्पादनांबाबत मार्गदर्शन केले. कृषी गुण नियंत्रक गणेश पाटील यांनी फळबाग लागवडीचे महत्व सांगत पांडुरंग फुंडकर फळबाग योजना व इतर विविध योजनांची माहिती दिली.
एक किलापर्यंतचे फळ, हंगामात उशिरा बाजारात आल्यामुळे मिळणारा अधिकचा दर, आकर्षक रंग व चमक या वैशिष्ट्यांनीयुक्त, सीताफळ पिकातील राजा, एनएमके-1 गोल्डन या जातीला देशातच नव्हे तर सातासमुद्रपारही विविध देशांमध्ये लोकप्रियता मिळाली असल्याचे तज्ञ प्रशिक्षक प्रवीण कसपटे यांनी सांगितले.
यावेळी कीड व रोग व्यवस्थापनाबाबत माहिती देत शेतकरी बांधवांना असलेल्या विविध समस्या व अडचणी यांविषयी मधुबन फार्म व नर्सरीचे संचालक रवींद्र कसपटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राज्याच्या कानाकोपर्‍यातून व कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. धनंजय राचकर, महिला शेतकरी सौ. शोभा गायकवाड व एनएमके-1 गोल्डन सीताफळाचे उत्पादक नंदकुमार लंबटकर  यांनी आपल्या शेतातील एनएमके-1 गोल्डन बद्दलच्या अनुभवाबाबत शेतकर्‍यांशी संवाद साधला.

 
Top