उमरगा  / प्रतिनिधी-

साखर कारखान्यांना दर वर्षी वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी कमी तर कधी जास्तीचा पाऊस पडतो. आजपर्यंत जात, धर्म, पक्ष पाहुन कधीही ऊसाचे राजकारण केले नाही. कारखान्यावर हजारो कुटुबाची रोजीरोटी अवलंबून आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो जगला पाहिजे. कारखानदारी टिकवणे व वाढविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित मिळून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी केले.

श्री विठ्ठलसाई साखर कारखान्यातर्फे कोरेगाव येथे ऊस परिषद शेतकरी संवादाचे आयोजन सोमवारी (दि.२७) करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कारखान्याचे संचालक बापुराव पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच कोंडीबा पांगे होते. यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, संचालक ॲड सुभाष राजोळे, संचालक केशव पवार, कार्यकारी संचालक एम बी अथणी, उमरगा पंसचे सभापती सचिन पाटील, नानाराव भोसले, विलास राजोळे, चंद्रशेखर पवार,  महालिंग बाबशेट्टी, प्रल्हाद काळे  आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कारखान्याचे संचालक बापुराव पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधून हंगामाचे काळात येणाऱ्या अडचणी, ऊस तोडणी प्रोग्रॅम, लेबर व वाहनांच्या समस्येबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी माडज, त्रिकोळी, वागदरी, गुगळगाव,  बेटजवळगा, कोरेगाववाडी आदी गावातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थिती होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऊसपुरवठा अधिकारी व्यंकट बलसुरे, सुत्रसंचलन व आभार ज्ञानेश्वर सुरवसे यांनी मानले. 

 
Top