उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबल्याकरिता जिल्ह्यातील नागरिकांसाठी औषधांचा साठा व ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून ११७२ खाटा उपलब्ध असून बाल रुग्णांसाठी स्वतंत्र ३०८ खाटा आहेत. बालरुग्णांसाठी स्वतंत्र ११० ऑक्सिजन बेड सज्ज आहेत. रुग्णसंख्येच्या दीडपट औषधे खरेदी करत असल्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर पालकमंत्री गडाख बोलत होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, जि.प.च्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा स्वातंत्र्य सैनिक गौरव समितीचे अध्यक्ष नामदेवराव माने, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक नायगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की, मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचा स्वातंत्र्य मिळवण्यासह मराठवाड्याच्या समग्र विकासाचाही ध्यास होता. त्या दृष्टीने शासनाचेही प्रयत्न आहेत. जिल्ह्याचा जलदगतीने विकास करणे म्हणजेच स्वातंत्र्य सैनिकांना खरी आदरांजली असल्याचेही गडाख यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्याचा दुसरा क्रमांक, ३ कोटींचे बक्षीस: जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२०-२१ साठी २६० कोटी ८० लाख रुपये मंजूर होते. पैकी २५९ कोटी ४० लाख रुपये खर्च केले. निती आयोगाने विकसित केलेल्या डॅशबोर्डच्या आधारे कृषी व जलस्त्रोत क्षेत्रात २०२० मध्ये जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आल्याने ३ कोटींचे बक्षीस मिळाले. हा निधी शेतकऱ्यांसाठी खर्च करत आहे. जिल्ह्यात यंदा ५८ लाख २० हजार वृक्षलागवड करत यात १४५ टक्के काम केल्याचे सांगितले.

कोरोनामुळे पालकांचा मृत्यू, बालकांना मदत

कोरोनामुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झालेली दहा बालके आहेत. या बालकांच्या संयुक्त बँक खात्यावर पाच लाख रुपयांचे तर पीएम केअर अंतर्गत दहा लाख रुपये जमा केले. बाल संगोपन योजनेतून दरमहा ११०० रुपये देण्यात येत आहेत. एका पालकाचा मृत्यू झालेल्या बालकांची संख्या २३१ असून त्यांनाही दरमहा ११०० रुपये देत आहेत. कोरोनामुळे पतीचा मृत्यू झालेल्या महिलांची संख्या एक हजार १४ आहे. यापैकी ५५० महिलांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित महिलांनाही सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ लवकरच देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ई-पीक पाहणीत जिल्हा राज्यातून प्रथम

१६ सप्टेंबर २०२१ अखेर जिल्ह्यातील चार लाख नऊ हजार ९९५ खातेदारांनी एक लाख ८० हजार ४४८ शेतकऱ्यांनी पिकांची नोंदणी ई-पीक पाहणी अॅपवर केली. ही संख्या औरंगाबाद विभागात सर्वाधिक असल्याने सरासरी उस्मानाबाद जिल्हा राज्यात सर्वप्रथम असल्याचेही ते म्हणाले.

 

 
Top