तेर/ प्रतिनिधी-

येथील अंगणवाडीत देण्यात येणाऱ्या पोषण आहारात अळ्या व जाळे आढळून आल्यामुळे याप्रकरणी अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे.

जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पातंर्गत चालविण्यात येत असलेल्या तेर येथील अंगणवाडीतील बालकांना ठेकेदारामार्फत पुरविला जाणाऱ्या सकस आहारात म्हणजे उपिट, शिरा बनवण्याच्या मिश्र पिठात अळ्या व जाळे निघाले आहे. वाटप केलेल्या आहारात हे आढळल्याने तेर येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प आधिकारी जे. जी. राठोड यांनी ग्रामस्थांसह आहाराची पाहणी केली. याबाबत पालकांनी तक्रार केली होती. हनुमंत कानाडे यांच्या श्रेया नावाच्या बाळाला अंगणवाडी क्रं. २०७ मधून दिलेल्या पुड्यात अळ्या आढळल्या. तेरमधील १४ अंगणवाडीतील बालक व गरोदर माता, अशा जवळपास ६०० पेक्षा अधिक लाभार्थ्यांना उपमा, शिरा व बालभोग या सकस आहाराचे पॉकिट वाटप करण्यात येते. तेर येथील एका महिला बचत गटाकडून हा खाऊ पुरविला जात आहे. तो निकृष्ट प्रतीचा आहे. त्यामुळे. बहुतांश पालकांनी अंगणवाडीच्या सेविकांकडून हा खाऊ घेण्यास नकार दिला. दरम्यान, तेर येथील प्रकल्प आधिकारी जे. जी. राठोड, विस्तार अधिकारी पी. बी. वळसे पर्यवेक्षिका मनीषा पाटील यांनी शुक्रवारी (दि. १७) खाऊच्या पॉकेट्सचा ग्रामस्थांसमवेत पंचनामा केला. पंचनाम्यावर ग्रामपंचायत सदस्य मंगेश पांगरकर, बापू नाईकवाडी, हरी खोटे, अविनाश इंगळे, हनुमंत कानडे, वैभव वैरागकर, सूरज इगळे, राजेंद्र कानडे, आमन कोळपे, महेश गाढवे, लक्ष्मण इंगळे यांच्यासह १८ ग्रामस्थांच्या सह्या आहेत. अंगणवाडी मधील बालकांना सकस आहाराऐवजी निकृष्ट प्रतीचा खाऊ पुरवठा होत आहे. सध्या साथरोगांचा काळ असल्याने पूर्वीप्रमाणेच पोषण आहाराचे वाटप करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य महेश पांगारकर यांनी केली आहे.



 
Top