उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 सीना-कोळेगाव धरणात परंडा व करमाळा तालुक्यातील स्थानिक मच्छिमारांना मच्छिमारी करण्यासाठी पास मिळावा या एकमेव प्रमुख  मागणीसाठी आज दि. ३ सप्टेंबरपासून मच्छीमारांचे आंदोलन सुरू करून उस्मानाबाद शहरातील सहाय्यक आयुक्त मत्स्य कार्यालय येथे मच्छीमारांनी ठिय्या मांडला आहे. परवाना मिळाल्याशिवाय इथून उठणार नसल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. आंदोलनाच्या सुरुवातीपासून घोषणा देऊन आंदोलन करणारे मच्छीमार अर्धनग्न आंदोलनाकडे वळले होते.

जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली सहायक मत्स्य आयुक्त कार्यालयात मच्छीमारांनी  आंदोलन करत आयुक्तांच्या रिकाम्या खुर्चीला माशांचा हार घालून आयुक्तांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. तरी देखील कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी चक्क जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या छतावर चढून निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.  जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा अतुल खोपसे- पाटील यांनी दिला आहे. सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत हे आंदोलन सुरूच होते.

 चर्चा निष्फळ

 आंदोलनाच्या सुरुवातीला आनंद नगर पोलिसांनी आंदोलक आणि प्रशासनात चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. सहायक आयुक्त न्यायालयीन कामासाठी औरंगाबाद येथे गेले असल्याने निर्णय घेण्यास सक्षम अधिकारी नाही. त्यामुळे आंदोलक आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याने पोलिसांनी केलेली चर्चा तूर्तास निष्फळ ठरली आहे.


 
Top