कळंब / प्रतिनिधी-

 कंत्राटी तत्वावर नियुक्त आरोग्य कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या कायम करा, अशी मागणी बुधवारी कळंब येथे करण्यात आली. उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांना निवेदनाचे पत्र देऊन ही मागणी करण्यात आली आहे. आगामी काळामध्ये कोरोनाची संभाव्य तिसरी लाट असल्याचे वैद्यकीय तज्ञ सांगत आहेत. अशात कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयअंतर्गत कार्यरत असलेल्या 21 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. 

केंद्र शासनाने covid-19 मध्ये सेवा देणाऱ्या कंत्राटी मनुष्यविकास निधी मंजूर केला नाही. त्यामुळे ते कंत्राटी कर्मचारी कमी करण्याचे पत्र राज्याचे आरोग्य सेवा विभागाच्या आयुक्तांनी काढले आहे. कळंब उपजिल्हा रुग्णालयातील 5 वैद्यकीय अधिकारी, 10 स्टाफ नर्स, 1 औषध निर्माते, 1 टेक्निशियन, 1 डाटा ऑपरेटर, तीन साफ सफाई कर्मचारी, अशी तब्बल 21 पदावरील कर्मचारी कार्यमुक्त होणार आहेत.

सध्या 7 नर्सेसवरच उपजिल्हा रुग्णालय व कोव्हिडं उपचार केंद्राचा कारभार चालू आहे. अशात आगामी काळात तिसरी लाट येणार असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. जर तिसरी लाट आली तर कळंब उपजिल्हा रुग्णालयात आणि कोव्हिडं सेंटरमध्ये कर्मचारी संख्या अपुरी पडणार आहे. त्यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून कार्यमुक्त करण्यात येणाऱ्या 21 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कायम कराव्या, या मागणीचे पत्र उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.

या निवेदनावर ऑक्सीजन ग्रुपचे सदस्य सुशील तीर्थकर, हर्षद अंबूरे, अकीब पटेल, सुमीत बलदोटा, विजय पारवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top